नगर तालुक्यात काँग्रेस आघाडीत ‘धुसफूस’
By Admin | Updated: September 19, 2014 23:38 IST2014-09-19T23:20:16+5:302014-09-19T23:38:47+5:30
अहमदनगर : नगर पंचायत समिती सभापती निवडीमुळे नगर तालुक्यात काँग्रेस आघाडीत चांगलीच धुसफूस पेटली

नगर तालुक्यात काँग्रेस आघाडीत ‘धुसफूस’
अहमदनगर : नगर पंचायत समिती सभापती निवडीमुळे नगर तालुक्यात काँग्रेस आघाडीत चांगलीच धुसफूस पेटली आहे.
ज्यांना सभापतीसाठी नीट अर्ज भरता येत नाही ते नगर तालुक्याचे राजकारण करायला निघाले. स्वत:च्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडण्यापेक्षा उमेदवारी अर्ज नीट भरायला शिका, असा टोला राष्ट्रवादीचे नगर पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांना राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव लामखडे व जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी लगावला. मोकाटे यांचा बोलविता धनी कोण? असा सवालही लामखडे-हराळ यांनी केला.
नुकत्याच झालेल्या नगर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीत काँग्रेस आघाडीच्या सदस्यामध्ये फाटाफूट झाली. काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे एक सदस्य उघडपणे महायुतीच्या गोटात दाखल झाल्याने नगर पंचायत समितीवर युतीचे वर्चस्व निर्माण झाले. सभापतीपदासाठी काँग्रेस आघाडीकडून उतरलेले गोविंद मोकाटे हे या निवडीत एकाकी पडले.
काँग्रेस आघाडीच्या फाटाफुटीस मोकाटे यांनी लामखडे व हराळ यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टिकास्त्र सोडले होते.
यानंतर लामखडे व हराळ यांनी या टिकेला उत्तर देताना म्हटले, सभापतीपदासाठी काँग्रेस आघाडीकडून अर्ज दाखल केला होता. मात्र अर्जाबरोबर जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या सभापतीपदाचा अर्ज बाद केला.
त्यामुळे मी निवडणुकीमधून माघार घेतली असे मोकाटे यांचे म्हणणे धादांत खोटे आहे. त्यांना स्वत:चा उमेदवारी अर्ज नीट भरता येत नाही.
त्यांनी स्वत:च्या चुकाचे पाप दुसऱ्याच्या माथी मारू नये. नगर तालुक्यात विकासाच्या मुद्यावर व तालुक्याच्या अस्तित्वासाठी वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र आल्याने मोकाटे सैरभैर झाले आहेत. त्यांनी आघाडीत विनाकारण भांडणे लावून ऐन विधानसभेच्या तोंडावर आघाडीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न चालू केला आहे.
(तालुका प्रतिनिधी)