काँग्रेस नेते स्वत:ला मिरवून घेतात
By Admin | Updated: June 10, 2014 00:13 IST2014-06-09T23:15:54+5:302014-06-10T00:13:05+5:30
संगमनेर : काँग्रेसचा मोठा पराभव होवून पक्ष नव्याने उदयास येईल, असे भाकीत आपण तीन वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. कारण काँग्रेसची नेतेमंडळी स्वत:लाच

काँग्रेस नेते स्वत:ला मिरवून घेतात
संगमनेर : काँग्रेसचा मोठा पराभव होवून पक्ष नव्याने उदयास येईल, असे भाकीत आपण तीन वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. कारण काँग्रेसची नेतेमंडळी स्वत:लाच मिरवून घेत असल्याने पक्षाचे नामोनिशाण मिटत चालले आहे, अशी खंत माजी मंत्री बी. जे. खताळ यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील झोळे येथे आयोजित ‘मित्रगौरव’ सोहळ्यात ते बोलत होते. शासनाचा सांस्कृतीक पुरस्कारप्राप्त रघुवीर खेडकर व पत्रकारितेत पी.एच.डी. प्राप्त करणारे डॉ. संतोष खेडलेकर यांचा गौरव खताळ यांच्या हस्ते झाला. खताळ म्हणाले, पूर्वी महात्मा गांधींच्या विचाराची काँग्रेस होती. पक्षासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी बलिदान दिले.
मात्र, त्यांनाच आजच्या पक्षातील नेते विसरले आहेत. शासनाच्या प्रत्येक योजना, विकासकामे, विकासनिधी हा पक्षाच्या माध्यमातून मिळत असताना स्वत:च्या नावाचा डिंगोरा पिटला जातो. सध्या व्यक्तीकेंद्रीत राजकारण होत आहे.
काँग्रेसच्या दृष्टीने हे घातक आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारे राजकारणी अस्तित्वात आल्याने पक्ष धोक्यात आला आहे. देशाच्या संसदेत राजकीय ‘तमाशा’ सुरू आहे. यामुळे पक्षाला एक प्रकारे तिलांजली मिळत आहे. काही वर्तमानपत्रेही अशा नेत्यांची चाकरी करू लागल्याने चुकीचा प्रचार होत असल्याचे खताळ यांनी सांगितले.
प्रास्ताविक व स्वागत अण्णासाहेब काळे यांनी केले. बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख, किसन हासे व प्रा. डॉ. संजय दळवी यांची मनोगते झाली. सूत्रसंचालन दिनकर साळवे यांनी करून जिजाबा हासे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी, राजेंद्रसिंह चौहान, डॉ. प्रसाद रसाळ, देवीदास गोरे, शिवराम बिडवे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)