काँग्रेसमुळेच शेतकऱ्यांना सव्वा कोटी विमा
By Admin | Updated: June 15, 2016 23:44 IST2016-06-15T23:42:51+5:302016-06-15T23:44:51+5:30
लोणी : नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकारनेच हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली.

काँग्रेसमुळेच शेतकऱ्यांना सव्वा कोटी विमा
लोणी : नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकारनेच हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली. या योजनेची व्याप्ती आपण कृषिमंत्री असताना वाढविल्यामुळेच दोन वर्षांत सव्वा कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले.
प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात राधाकृष्ण विखे यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त जलक्रांती अभियानाचा लोकार्पण सोहळा आणि कार्यकर्त्यांना ५ रोपे देवून वनक्रांती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.विविध योजनांच्या लाभार्थींना प्रमाणपत्र, कृषी औजारे आणि इतर साहित्यांचे वाटप केले. शिर्डी मतदारसंघातील मोफत अपघात विमा योजनेतील लाभार्थींना धनादेशाचे वितरण यावेळी केले. दुष्काळी पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा सत्कार विखे यांनी स्वीकारला नाही. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी जि. प. अध्यक्षा शालिनी विखे, अण्णासाहेब शेलार, डॉ. विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, उपाध्यक्ष पोपटराव लाटे, जि.प.सदस्य डॉ.भास्करराव खर्डे, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कांचन मांढरे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, बाबासाहेब डांगे उपस्थित होते.
राधाकृष्ण विखे म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. या विमा योजनेचा सन २०१४ साली ४० लाख व २०१५ साली ८० लाख शेतकऱ्यांना ४५०० कोटी रुपयांचा लाभ मिळाला.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी कार्यक्रमस्थळी आली होती़ शेतकऱ्यांनो घाबरु नका, हिमतीने जीवनाला सामोरे जा, असा संदेश या मुलांनी दिला़ (वार्ताहर)
डॉ. सुजय विखे यांनी जलक्रांती अभियानाचे महत्व विषद केले. लोकांच्या सहभागाने यशस्वी झालेले अभियान आता वनक्रांतीच्या माध्यमातून पुढे नेण्याचा आपला विचार आहे. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांच्या वाढदिवसानिमित्त या अभियानाचा संकल्प आपण केला होता. आज या अभियानाचा लोकार्पण सोहळा होत असल्याचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभियानात सहभागी झालेल्या २० ही गावांतील कार्यकर्त्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
राज्यात विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करावेच लागते. २९ जिल्ह्यांमधील विविध प्रश्न आणि समस्या आपण जाणून घेतल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाने दत्तक घ्यावे, ही आपली मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे, अशी माहिती विखे यांनी या कार्यक्रमात दिली़