उड्डाणपुलाच्या मार्गावरील कामे तात्काळ पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:35+5:302021-06-09T04:25:35+5:30
अहमदनगर : उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील भूसंपादनासह इतर केबल, गटारी आणि जलवाहिनीची कामे तत्काळ पूर्ण करा, असा ...

उड्डाणपुलाच्या मार्गावरील कामे तात्काळ पूर्ण करा
अहमदनगर : उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील भूसंपादनासह इतर केबल, गटारी आणि जलवाहिनीची कामे तत्काळ पूर्ण करा, असा आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी संबंधित यंत्रणांना दिला. तसेच या मार्गावरील वाहतूक काही दिवस अन्य मार्गाने वळविण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी उड्डाणपुलाबाबत अधिकाऱ्यांची समन्वय बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रफुल्ल दिवाण, महावितरण, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद - पुणे महामार्गावरील अशोका हॉटेलपासून ते सक्कर चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. महामार्गाच्या मध्यभागी मोठे खांब उभे करण्यात आले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक सध्या सुरू आहे. या मार्गावर अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. याबाबत स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी आयुक्तांना पत्र दिले होते. उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मातीचे ढीग पडलेले आहेत. विद्युत तारांचेही जाळे आहे. गटारीही उघड्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. उड्डाणपुलाच्या कामामुळे आधीच वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे रस्त्यांतील सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे यावेळी ठरले. यावेळी दिवाण यांनी कोठी ते सक्कर चौक, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागणार असल्याचे सांगितले. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावर वळविण्याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्याविषयी बैठकीत चर्चा झाली असून, ही वाहतूक अन्य मार्गावरून वळवली जाणार असल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले.
.....
वाहतुकीची कोंडी
उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने औरंगाबाद - पुणे महामार्गावर जीपीओ चौक ते सक्कर चौक या मार्गावर कायमच वाहतुकीची कोंडी होत आहे. लॉकडाऊन असल्याने वाहतूक बंद होती. मात्र, सोमवारपासून या मार्गावरील वाहतूक सुरू झाली असून, या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.
---
फोटो