‘त्या’ स्पिरिटच्या टँकरबाबत मंत्र्यांकडे तक्रार; तपास का रखडला? याची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 16:16 IST2020-05-02T16:15:19+5:302020-05-02T16:16:00+5:30
नगर-मनमाड रोडवरील बाभळेश्वर शिवारात अवैध स्पिरिट घेऊन जाणारा टँकर पकडला होता़ मात्र, या अवैध स्पिरिटबाबतचा तपास खडल्याने या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

‘त्या’ स्पिरिटच्या टँकरबाबत मंत्र्यांकडे तक्रार; तपास का रखडला? याची चौकशी करा
अहमदनगर : राज्य उत्पादन शुल्कच्या श्रीरामपूर येथील पथकाने १४ मार्च रोजी नगर-मनमाड रोडवरील बाभळेश्वर शिवारात अवैध स्पिरिट घेऊन जाणारा टँकर पकडला होता़ मात्र, या अवैध स्पिरिटबाबतचा तपास खडल्याने या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.
या तक्रारीत चंगेडे यांनी म्हटले आहे, उत्पादन शुल्कच्या पथकाने बाभळेश्वर परिसरात पकडलेल्या स्पिरिटच्या टँकरचा तपास गेल्या दीड महिन्यांपासून रखडला आहे. उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेल्या दोघा टँकर चालकांकडे गेटपास मिळून आले आहेत. ताब्यात घेतलेल्या दोघा चालकांना दुसºया दोघांनी श्रीगोंदा परिसरातील टोल नाक्याजवळ हा स्पिरीटचा टँकर दिला होता. या टँकर चालकांच्या जबाबात विसंगती आहे. हा टँकर धुळे येथे जात होता. तेथे कुणाला हे स्पिरिट देण्यात येणार होते व कोणत्या कारखान्यातून हे स्पिरिट खरेदी केले. यासंदर्भात अद्यापपर्यंत काहीच तपास झालेला नाही. यासंदर्भात आपण स्वत: लक्ष घालून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, असे या तक्रारीत म्हटले आहे.
काय आहे प्रकरण
उत्पादन शुल्कने १४ मार्च रोजी पकडलेल्या टँकरमध्ये २२ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १८ हजार लीटर स्पिरिट (मद्यार्क) जप्त केले. यावेळी टँकरमधील दोघांना अटक करण्यात आली. हे स्पिरिट धुळे येथे गावठी दारू तयार करण्यासाठी नेण्यात येत होते. या प्रकरणाचा उत्पादन शुल्कचे श्रीरामपूर येथील निरीक्षक अनिल पाटील हे तपास करत आहेत. दरम्यान पाटील यांच्या पथकाने या प्रकरणात आणखी दोघा टँकर चालकांना अटक केली. मात्र, हे स्पिरीट कोणत्या कारखान्यातून खरेदी केले होते, हे समोर आलेले नाही. दरम्यान या संदर्भात या प्रकरणाचे तपासी अधिकारी अनिल पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
स्पिरिट टँकरसह उत्पादन शुल्क विभागातील अनेक प्रकरणे प्रलंबित असून त्याचा तपास रखडलेला आहे. यासंदर्भात मी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहे, असे आरटीआय कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी सांगितले.