भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केंद्र सरकार विरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST2021-05-27T04:23:09+5:302021-05-27T04:23:09+5:30
अहमदनगर : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहा महिने होत असताना केंद्र सरकारने मागण्या मान्य न करता आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या ...

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केंद्र सरकार विरोधात निदर्शने
अहमदनगर : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहा महिने होत असताना केंद्र सरकारने मागण्या मान्य न करता आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व आयटक कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी शहरातील पक्ष कार्यालयासमोर केंद्र सरकारचा निषेध म्हणून निदर्शने करून ‘मोदी चले जाव’च्या घोषणा दिल्या.
या आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव अॅड. कॉम्रेड सुभाष लांडे, आयटकचे अॅड. कॉम्रेड सुधीर टोकेकर, कामगार संघटना महासंघाचे बहिरनाथ वाकळे, सतीश पवार, तुषार सोनवणे, दीपक शिरसाठ आदी सहभागी झाले होते.
सात वर्षांपूर्वी भाजप सरकार सत्तेवर येऊन २६ मे रोजी मोदी सरकारचा शपथविधी झाला होता. मोदी सरकारने शेतकरी, कामगार व जनविरोधी धोरणे राबविल्याचा आरोप करून का काळा दिवस पाळला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी अॅड. सुभाष लांडे म्हणाले की, शेतकरी व कामगारांच्या आंदोलनाला सहा महिने होत असतानादेखील केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. सात वर्षांत मोदी प्रणित भाजप सरकारने शेतकरी, शेतमजूर, कामगारांना देशोधडीला लावले. भांडवलदारांच्या हिताचे कामगार व शेतकरी कायदे पारित केले. खतांच्या किमती वाढवून पुन्हा कॉर्पोरेट कंपन्यांना १४ हजार कोटी रुपये अनुदान दिले. शेतकरी व कामगार विरोधी कायदे करण्याचा मोदींच्या धोरणाविरोधात संपूर्ण देश पेटून उठला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ओळी- दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहा महिने होत असताना, केंद्र सरकार मागण्या पूर्ण न करता आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अ.भा. किसान सभा व आयटक कामगार संघटनेच्यावतीने केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली.
------
फोटो -२६भाकप