बदली आदेश नसताना आयुक्तांनी सोडला पदभार

By Admin | Updated: May 11, 2016 23:58 IST2016-05-11T23:52:31+5:302016-05-11T23:58:50+5:30

संदीप रोडे, अहमदनगर अहमदनगर महापालिकेचे आयुक्त विलास ढगे यांची बदली झाली नसल्याचे शासन दप्तरी दिसत असून बदली झालेली नसताना त्यांनी पद्भार सोडलाच कसा? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Commissioner without assigning order | बदली आदेश नसताना आयुक्तांनी सोडला पदभार

बदली आदेश नसताना आयुक्तांनी सोडला पदभार

संदीप रोडे, अहमदनगर
अहमदनगर महापालिकेचे आयुक्त विलास ढगे यांची बदली झाली नसल्याचे शासन दप्तरी दिसत असून बदली झालेली नसताना त्यांनी पद्भार सोडलाच कसा? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. नव्याने नियुक्त झालेले दिलीप गावडे यांनी महापालिका आयुक्त पदाचा घेतलेला पद्भार म्हणजे शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व नगरविकास विभागात समन्वय नसल्याचे उघड झाले आहे.
अहमदनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विजय कुलकर्णी यांची १३ जुलै २०१५ रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात बदली झाली. त्यानंतर सोलापूर येथे अतिरिक्त आयुक्त असलेले विलास ढगे यांची कुलकर्णी यांच्या जागी २१ जुलै २०१५ मध्ये अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली. ढगे यांनी गत महिन्यातच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज शासनाकडे सादर केला आहे. त्यावर अजून निर्णय झालेला नाही आणि त्यांचा वर्षभराचा कालावधीही नगरमध्ये पूर्ण झालेला नाही. विलास ढगे यांच्या बदलीबाबत कोणताच आदेश अहमदनगर महापालिकेला आजतागायत प्राप्त झालेला नाही. ढगे यांनाही वैयक्तिक असा आदेश प्राप्त झालेला नाही.
गोंदिया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले दिलीप गावडे यांना २९ मार्च २०१६ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नतीने समाविष्ट करून घेण्यात आले. पदोन्नतीनंतर त्यांना अहमदनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून ४ मे २०१६ रोजीच्या आदेशाने नियुक्ती देण्यात आली. ड वर्ग अहमदनगर महापालिकेला प्रथमच भाप्रसे अधिकारी मिळाला. गावडे यांची अहमदनगरला बदली झाल्यानंतर त्यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडून पद्भार स्वीकारावा असे पत्र २७ एप्रिल २०१६ रोजी सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय यांनी काढले. हे पत्र अहमदनगर महापालिकेला प्राप्त झाले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव सरीता बांदेकर-देशमुख यांनी ६ मे २०१६ रोजी सुधारित पत्र काढून आयुक्त विलास ढगे यांच्याकडून गावडे यांनी पद्भार स्वीकारावा असे म्हटले. मात्र हा पत्रव्यवहार होत असताना किंवा बदली आदेश निघत असताना विलास ढगे यांची बदली झाल्याचे कोणतेच आदेश शासनाच्या नगरविकास विभागातून निघालेले नाहीत. मग बदली झाली नसताना ढगे यांनी आयुक्त पदाचा पद्भार सोडलाच कसा? असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरी सेवा मंडळाची शिफारस नाही
सर्वोच्च न्यायालयाच्या २०११ मधील निर्देशानुसार मुख्याधिकारी व भाप्रसे संवर्गातील बदली करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणास शिफारस करण्यासाठी नागरी सेवा मंडळ शासनाने ९ एप्रिल २०१४ मध्ये स्थापन केले आहे. ढगे व गावडे यांचे बदली आदेश निघत असताना नागरी सेवा मंडळासमोर ते गेलेच नाहीत. त्यामुळेच हा घोळ निर्माण झाला असल्याचे प्राप्त माहितीवरून स्पष्ट होते.
ढगे यांच्या बदलीबाबत नगरविकास विभागातून कोणतेही आदेश निघालेले नाहीत. सामान्य प्रशासन विभागाने ढगे यांच्या जागी आयुक्त म्हणून कोणातरी भाप्रसे अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्याचा कोणताच अहवाल नगरविकास विभागाला प्राप्त झालेला नाही. विलास ढगे हे नियुक्ती मागण्याकरीता येतील. त्यानंतर पुढील निर्णय होईल.
-ज. ना. पाटील,
उपसचिव, नगरविकास विभाग
मुख्याधिकारी संवर्गातील बदल्या या नगरविकास विभागातून तर ‘भाप्रसे’च्या बदल्या या सामान्य प्रशासन विभागामार्फत केल्या जातात. नगरविकास व सामान्य प्रशासन विभागात समन्वय नसल्याने ढगे यांच्या बदलीचा घोळ झाला आहे. ढगे यांच्या बदलीबाबत कोणतेच आदेश मनपाला मिळालेले नाही. गावडे यांची बदली करताना शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे.
-शाकीर शेख

Web Title: Commissioner without assigning order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.