मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचा आयुक्तांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:21 IST2021-04-07T04:21:55+5:302021-04-07T04:21:55+5:30
अहमदनर : कोरोना रोखण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली असून, कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मंगल कार्यालये ताब्यात घेण्यात येणार ...

मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचा आयुक्तांचा आदेश
अहमदनर : कोरोना रोखण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली असून, कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मंगल कार्यालये ताब्यात घेण्यात येणार आहेत. तसा आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी मंगळवारी जारी केला.
शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी एका दिवसात नगर शहरात ६६६ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बाधितांसह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना चाचणीसाठी पाठविले जात आहे. साखळी तोडण्यासाठी चाचणी वाढविण्याबरोबरच रुग्णांच्या विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात येत आहे. आतापर्यंत महापालिकेने पाच कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत; परंतु तिही कमी पडणार आहेत. त्यामुळे महापालिकेने न्यू आर्टस्, अहमदनगर, आठरे पाटील महाविद्यालयाच्या इमारतींची पाहणी केली; परंतु सध्या महाविद्यालये सुरू आहेत. त्यामुळे महाविद्यालयांच्या इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करणे शक्य नाही. महाविद्यालयांच्या इमारत मिळत नसल्याने महापालिकेने मंगल कार्यालयांची चाचपणी केली. शासनाने नियम पाळून लग्नसमारंभासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांनीही इमारत देण्यास नकार दिला होता; परंतु इमारत मिळत नसल्याने मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचा आदेश जारी करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात सहा मंगल कार्यालये ताब्यात घेतली जाणार आहेत. मंगल कार्यालये ताब्यात घेऊन तिथे काेविड केअर सेंटर्स सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी खाटा, गाद्या, सतरंजी, पाणी, आदी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.
....
खाटा, गाद्या, चादरीच्या खरेदीसाठी निविदा
महापालिकेने कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत. मंगल कार्यालये ताब्यात घेऊन तिथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत असून, मनपाने ८०० खाटा, बेडशीट, २ हजार चादरी आणि ३ हजार सतरंजा खरेदी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.