राहाता तालुक्यात दिलासादायक चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:29+5:302021-05-27T04:22:29+5:30
दुसऱ्या लाटेत तालुक्यात प्रथमच व्हेंटिलेटर, आयसीयू व ऑक्सिजन बेडची उपलब्धता झाली असून अनेक कोविड रुग्णालयात एकही रूग्ण नाही. गेले ...

राहाता तालुक्यात दिलासादायक चित्र
दुसऱ्या लाटेत तालुक्यात प्रथमच व्हेंटिलेटर, आयसीयू व ऑक्सिजन बेडची उपलब्धता झाली असून अनेक कोविड रुग्णालयात एकही रूग्ण नाही. गेले काही दिवस बंद पडलेली नॉन कोविड सेवाही हळूहळू सुरू होत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाल्याची माहिती राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने तालुक्यात आजवरची उच्चतम पातळी गाठली होती. एका दिवसात तब्बल चारशे रुग्ण आढळले होते तर दोन हजार रुग्ण एकाचवेळी उपचार घेत होते. गावोगावी उभारण्यात आलेल्या व्यवस्थेमुळे आयसोलेशन बेडची उपलब्धता असली तरी ऑक्सिजन, रेमडेसिविरच्या तुटवड्याबरोबरच व्हेंटिलेटर, आयसीयू व ऑक्सिजन बेडही मिळणे दुरापास्त झाले होते. एप्रिल महिन्यात जवळपास अडीचशे रुग्णांचा मृत्यू झाला.
तालुक्यात साई संस्थानचे साईआश्रम व साईबाबा रुग्णालय तसेच प्रवरा कोविड सेंटर व प्रवरा हॉस्पिटलसह लहानमोठ्या वीस रुग्णालयात एकूण २०५१ बेडची उपलब्धता आहे. त्यात आयसोलेशन बेड १,४३४, ऑक्सिजन बेड ५४३, आयसीयू बेड ७४ तसेच ४४ व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. सध्या यातील १,२५० आयसोलशन बेड, २६९ ऑक्सिजन बेड, १७ आयसीयू बेड व २ व्हेंटिलेटर बेड रिकामे आहेत. सध्या तालुक्यात ५१५ रुग्ण उपचार घेत असून त्यातील जवळपास ४९ रुग्ण बाहेरच्या तालुक्यातील असल्याची माहिती तहसीलदार हिरे यांनी दिली.
................
थोड्याफार गैरसोयी होत असल्या तरी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे श्रद्धेने पालन केले, काही दिवस सबुरी धरली तर आपण लवकरच कोरोनाला हद्दपार करू.
- गोविंद शिंदे, प्रांताधिकारी