पुढच्या बुधवारी परत या...!

By Admin | Updated: December 11, 2014 00:37 IST2014-12-11T00:34:27+5:302014-12-11T00:37:49+5:30

चंद्रकांत शेळके, अहमदनगर ‘अहो, सकाळी स्पेशल गाडी करून पेशंटला रूग्णालयात आणलं, अर्धा तास नंबर लावून केसपेपर घेतला, नंतर डॉक्टरांना दाखवण्याच्या रांगेत सुमारे दोन तास ताटकळत उभे राहिलो,

Come back next Wednesday ...! | पुढच्या बुधवारी परत या...!

पुढच्या बुधवारी परत या...!

चंद्रकांत शेळके, अहमदनगर
‘अहो, सकाळी स्पेशल गाडी करून पेशंटला रूग्णालयात आणलं, अर्धा तास नंबर लावून केसपेपर घेतला, नंतर डॉक्टरांना दाखवण्याच्या रांगेत सुमारे दोन तास ताटकळत उभे राहिलो, बारा वाजता नंबर आला, पेशंट स्ट्रेचरवरून आत घेणार एवढ्यात डॉक्टर पेशंटला ओलांडून ‘व्हा बाजूला’ म्हणत भर्रकन निघून गेला. पुन्हा डॉक्टर येणार की नाही, याबाबत कुणालाही काही सांगता येईना. चार वाजेपर्यंत थांबून जड पावलांनी अखेर घरचा रस्ता धरला...’ आपल्या रूग्णाला स्टेचरवरून गाडीकडे नेताना प्रवीण नगरे या त्रस्त नागरिकाने डोळ्यात पाणी आणत ‘लोकमत’कडे
दिलेली प्रतिक्रिया.
अपंगांचे प्रमाणपत्र काढताना त्यांचे होणारे हाल, डॉक्टरांची अरेरावी, कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेली उद्धट उत्तरे, एकच दिवस असल्याने अपंगांची झालेली प्रचंड गर्दी, प्रमाणपत्र तर नाहीच, परंतु दिवसभरात त्यांची झालेली परवड, असे विदारक चित्र ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळले. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे रांगेत रूग्ण असतानाही त्यांना मध्येच सोडून वेळ संपली म्हणून डॉक्टरांचे निघून जाणे. पुन्हा डॉक्टर कधी येणार, याचा उलगडा अख्ख्या रूग्णालयात कोणीच करू शकत नाही. अपंग रूग्ण, त्यांच्याबरोबर आलेले नातेवाईक फक्त एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहून नाराजी व्यक्त करत येणाऱ्या-जाणाऱ्याकडे डॉक्टरची चौकशी करत होते. परंतु अखेरपर्यंत त्यांना कोणतीच माहिती मिळत नव्हती. केवळ आणि केवळ डॉक्टर शोधण्यातच पूर्ण दिवस जातो, तेथे प्रमाणपत्र, इतर उपचाराची हमी ती काय?
आठवड्याचा एकच दिवस म्हणजे बुधवारी अपंगांचे प्रमाणपत्र जिल्हा रूग्णालयात मिळते. तालुकास्तरावर सोय नसल्याने जिल्हाभरातून अपंगांची गर्दी बुधवारी जिल्हा रूग्णालयात झालेली होती. केसपेपर काढण्यासाठीच्या रांगा लांबपर्यंत गेलेल्या. कसाबसा केसपेपर हस्तगत करून पुन्हा अस्थिरोग तज्ज्ञाकडे तपासणी करण्यासाठी जाण्याची घाई अपंग व त्यांच्या नातेवाईकांत दिसत होती. परंतु तिथेही तिच तऱ्हा. डॉक्टरचा चेहरा दिसेना एवढी गर्दी.
बाहेर कोणीही वॉर्डबॉय नाही, दरवाजात एकच गर्दी, रेटारेटी करून अपंग कसेबसे तोल सांभाळत डॉक्टरकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. कोणी कुबडीवर, व्हीलचेअरवर, तर कोणी स्ट्रेचरवर, ज्यांना उभे राहणं शक्य नव्हतं ते बाहेरच्या खुर्च्यांवर स्थिरावले होते. परंतु बसून राहिले तर नंबर येण्याची शाश्वती नाही, म्हणून त्यांचाही अधूनमधून पुढे घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू होता. त्यातच मध्ये एकदा डॉक्टर काही कामासाठी बाहेर गेले, ते अर्धा तास आलेच नाहीत.
त्यामुळे गर्दीत आणखीच भर पडली. ज्यांची तपासणी झाली त्यांना पुढील तपासणीसाठी क्रमांक ५२ मध्ये जाण्याचा सल्ला दिला जात होता. त्यामुळे इकडची गर्दी काही वेळात तिकडे दिसत होती. सकाळपासून साधारण १५०-२०० अपंग, त्यांचे नातेवाईक, रेल्वे पास सवलत, शालेय सवलत, तसेच इतर कामांसाठी आलेल्या लोकांनी सिव्हिल ओसंडून वाहत होते. तपासणीसाठी फक्त एकच डॉक्टर असल्याने त्यांच्याकडेच सर्वांच्या नजरा लागलेल्या. काही कारणास्तव डॉक्टर बाहेर गेले की अपंगांचे चेहरे पडायचे, रांगा जराशा शिथिल व्हायच्या, परंतु गेटमध्ये डॉक्टर येताहेत हे दिसल्याबरोबर पुन्हा रांगेत उभे राहत व चेहऱ्यावर समाधान व्यक्त करत अपंगांच्या आशा पल्लवित होत होत्या. बरोबर बाराच्या ठोक्याला डॉक्टर जे निघून गेले ते पुन्हा आलेच नाहीत. सुमारे २५-३० रूग्ण रांगेत तसेच उभे होते. नंतरही काही आले. परंतु चार वाजेपर्यंत वाट पाहूनही डॉक्टर न आल्याने अखेर अपंगांचेही अवसान गळाले अन् जो-तो पुन्हा गावाच्या वाटेने निघाला, पुन्हा पुढच्या बुधवारी यायला.

Web Title: Come back next Wednesday ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.