‘महाकरंडक’ साठी रंगीत तालीम
By Admin | Updated: January 12, 2016 23:34 IST2016-01-12T23:25:21+5:302016-01-12T23:34:56+5:30
अहमदनगर : महाराष्ट्रातील सर्वांत मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून गौरविलेल्या ‘अहमदनगर महाकरंडक’ एकांकिका स्पर्धेला यंदा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे़

‘महाकरंडक’ साठी रंगीत तालीम
अहमदनगर : महाराष्ट्रातील सर्वांत मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून गौरविलेल्या ‘अहमदनगर महाकरंडक’ एकांकिका स्पर्धेला यंदा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे़ प्राथमिक फेरीत तब्बल ८५ एकांकिकांचे सादरीकरण झाले़ २ ते १० जानेवारी दरम्यान पुणे, मुंबई, सांगली, नाशिक व औरंगाबाद केंद्रावर प्राथमिक फेरी घेण्यात आली़ प्राथमिक फेरीचा मंगळवारी निकाल जाहीर करण्यात येणार असून, अंतिम फेरीसाठी २५ एकांकिका निवडल्या जाणार आहेत़
सोमवारी नगर येथे झालेल्या फेरीत १८ संघांनी एकांकिकांचे सादरीकरण केले़ आता अंतिम फेरीसाठी कोणत्या एकांकिका निवडल्या जाणार, याकडे कलाकारांचे लक्ष लागून आहे़ स्पर्धेच्या अंतिम फेरीला नगर शहरात २१ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे़ यंदा या स्पर्धेचे आयोजन पूर्णत: डिजिटल पद्धतीने करण्यात आले आहे़ ‘रंगभूमीची रणभूमी’अशी टॅग लाईन असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून नगरच्या नाट्यक्षेत्राचे चांगलेच ग्लॅमर वाढले आहे़ यंदा या स्पर्धेत स्थानिक कलारांनाही मोठी संधी मिळणार आहे़ या स्पर्धेत एकूण ३ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत़ त्यामुळे महाकरंडक स्पर्धेतील सहभागासाठी राज्यभरातील संघांनी चांगलीच तयारी केली आहे़ महाकरंडक एकांकिका स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स अँण्ड एंटरटेन्मेंट व महावीर प्रतिष्ठानद्वारे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्साह अन् उत्कंठा
अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा अल्पावधीतच राज्यात लोकप्रिय झाली आहे़ अंतिम फेरीसाठी ८५ पैकी २५ एकांकिका निवडल्या जाणार आहेत़ आता यामध्ये कुणाला संधी मिळते, याची उत्कंठा कलाकारांना लागून आहे़ या स्पर्धेत दर्जेदार सादरीकरण करत बक्षीस मिळवायचे, हा उत्साहही सोमवारी सप्तक सदन येथे प्राथमिक फेरीदरम्यान दिसून आला़ (प्रतिनिधी)