शेवगाव : येथील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याने वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.२५) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
आदेश विजय म्हस्के (वय १८, रा. पवारवस्ती, शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कॉमर्सच्या वर्गात शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे विद्यालय सुरू झाल्यानंतर विद्यार्थी विद्यालयात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांना शेजारच्या बंद असलेल्या वर्गातील छताच्या पाईपला लटकलेल्या अवस्थेत आदेश दिसला. विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर प्राचार्य करमसिंग वसावे यांनी तत्काळ शेवगाव पोलिसांना व मुलाच्या नातेवाइकांना फोनवरून कळविले.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार अभिषेक बाबर, रामहरी खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. आदेशचा चुलत भाऊ संतोष बाबासाहेब म्हस्के याने शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
आदेश बुधवारी (दि.२४) सकाळी कॉलेजमध्ये गेला होता. त्यानंतर तो घरी आला. जेवण करून ‘गावी जायचे असल्याने दोन दिवस कॉलेजमध्ये येणार नाही’ हे शिक्षकांना सांगण्यासाठी पुन्हा कॉलेजमध्ये गेला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे त्याची आई लक्ष्मीबाई पवार यांनी बुधवारी रात्री अकराच्या सुमारास शेवगाव पोलीस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार नोंदवली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. आदेशच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. तो वर्गात शांत असायचा. त्याला जास्त मित्रही नव्हते. तसेच तो काही दिवसांपासून आजारी असल्याने अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात होता, असे शिक्षकांनी सांगितले.
---
२५ आदेश म्हस्के