‘देव द्या, देवपण घ्या’ अभियानातून १२३० गणेशमूर्तींचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:49+5:302021-09-21T04:22:49+5:30
अकोल्यातील एकाही मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला नाही. घरगुती गणेश उत्सव साजरा केला गेला. नगरपंचायतीने प्रवरा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यांची ...

‘देव द्या, देवपण घ्या’ अभियानातून १२३० गणेशमूर्तींचे संकलन
अकोल्यातील एकाही मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला नाही. घरगुती गणेश उत्सव साजरा केला गेला. नगरपंचायतीने प्रवरा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यांची नाकेबंदी करून नागरिकांना प्रवरा नदीपात्रात गणेश विसर्जन करू दिले नाही. अगस्ती कमान, अगस्ती सेतू पूल, माॅडर्न हायस्कूल चौक, अगस्ती मंगल कार्यालय अशा चार ठिकाणी गणेशमूर्ती व निर्माल्य दान सुविधा नगरपंचायतीने उपलब्ध करून दिली होती. या ठिकाणी १२३० गणेशमूर्ती जमा झाल्या. त्यांचे नगरपंचायतीच्या वतीने विधिवत विसर्जन करण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम सर्वच उत्सवांवर झालेला आहे. त्यामुळे लाडक्या गणरायाचे विसर्जन देखील अगदी साध्या पद्धतीने झाले. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी नागरिकांना गणेशमूर्तीचे प्रवरा नदीत विसर्जन न करता मूर्ती व निर्माल्य दान करण्याचे आवाहन केले होते. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सामाजिक कार्यकर्ते शरद नवले यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक १४ मध्ये धुमाळवाडी रोड येथे गणेश विसर्जनाची व्यवस्था केली होती. गणेश विसर्जन व्यवस्थेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कोरोनाचे सर्व नियम पाळत गणपती बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला.