संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:57+5:302020-12-15T04:36:57+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू ...

संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू
अहमदनगर : जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू झाली आहे. त्यामध्ये नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्राचाही समावेश आहे. मात्र, महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करायची की नाही ? याबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले आहे.
जिल्ह्यातील एकूण १३१८ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या ६६७ इतकी आहे. ही संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राचाही समावेश आहे. नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामपंचायत क्षेत्र यामध्ये फारसे अंतर नसते. त्यामुळे नगपपालिका क्षेत्राशी संबंधित विकास कामांचा, कार्यक्रमांचा मतदारांवर प्रभाव निर्माण होऊ शकतो. शेजारील गावांचाच नगरपालिका हद्दीत समावेश होतो. या गावांच्या लगतच अनेक ग्रामपंचायती असतात. त्यामुळे आचारसंहितीची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात आहे.
-------------
एकूण संख्येपैकी निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक असेल तर संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू केली जाते. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात सगळीकडे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करायची की नाही, याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले आहे. हे मार्गदर्शन राज्यासाठीही उपयुक्त राहील.
-ऊर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी, महसूल
-----------
सव्वामहिना आचारसंहिता
११ डिसेंबरला निवडणूक जाहीर झाली. त्या दिवसापासून ते १८ जानेवारीपर्यंत आचारसंहिता असेल. या कालावधीत मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती खासदार, आमदार, स्थानिक संस्थांमधील लोकप्रतिनिधी यांना करता येणार नाही. जी विकास कामे अर्धवट किंवा प्रगतिपथावर आहेत, अशी कामे आचारसंहिता काळातही करता येतील. कोविडसंबंधित किंवा अत्यावश्यक कामांना आचारसंहितेमधून वगळण्यात आले आहे.