लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शासनाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी तसा आदेश जारी केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विविध कार्यकारी सोसायटींसह सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका वेळोवेळी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्याची मुदत ३१ मार्च रोजी संपुष्टात आली होती. दरम्यानच्या काळात पुन्हा काेरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मागील डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या निवडणुका चालू आर्थिक वर्षात होतील, अशी अशा होती; परंतु काेरोनाची दुसरी लाट येऊन धडकली आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानुसार ही निवडणूक घेण्यात आली. जिल्हा बँकेची निवडणूक पार पडल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने इतर संस्था व सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने सध्याच्या संचालक मंडळाला पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे.