गुढीवर तांब्या पालथा घालण्याची प्रथा बंद
By Admin | Updated: March 28, 2017 13:26 IST2017-03-28T13:26:09+5:302017-03-28T13:26:09+5:30
साडी चोळीची गुढी उभारून त्यावर तांब्या पालथा घालण्याची गुढीपाडव्याची पारंपारिक प्रथा सारोळा कासार ग्रामस्थांनी बंद केली

गुढीवर तांब्या पालथा घालण्याची प्रथा बंद
>
अहमदनगर : साडी चोळीची गुढी उभारून त्यावर तांब्या पालथा घालण्याची गुढीपाडव्याची पारंपारिक प्रथा सारोळा कासार (ता.नगर) ग्रामस्थांनी बंद केली असून त्याऐवजी भगव्या पताकांची गुढी उभारत हिंदू नववर्षाचे स्वागत नव्या पद्धतीने सुरु केले आहे. त्यामुळे गावात प्रत्येक घरावर उभारलेल्या भगव्या पताकांनी गाव भगवेमय झाले़
सैनिक आणि गुरुजींचे गाव म्हणून ओळख असणाºया सारोळा कासार गावात गेल्या चार वर्षांपासून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. तीन वर्षांपूर्वी तिथीप्रमाणे गावात शिवजयंतीचा उपक्रम राबविण्यात आला. त्यात आळंदी येथील माउली महाराज कदम यांचे गुढीपाडवा बाबत व्याख्यान झाले. त्यांनी गावकºयांशी बोलताना साडी-चोळी ऐवजी भगव्या पताकांची गुढी उभारणेच शुभ असते तसेच हिदुसंस्कृतीला धरून असल्याचे सांगत साडी चोळीची गुढी उभारून त्यावर तांब्या पालथा घालणे हे अशुभ असल्याचे स्पष्ट केले. नववर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभारायाची असेल तर ती विविध संतांनी आपल्या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे भगव्या पताकांचीच उभारली जावी, असे आवाहन कदम यांनी गतवर्षी केले होते. या आवाहनाचा सारोळा ग्रामस्थांनी गांभीर्याने विचार केला आणि यापुढे गुढी पाडव्याला भगव्या पताका लावण्याची आणि त्यावर तांब्या पालथा न घालण्याचा निर्धार केला़ त्यामुळे यंदा गावात भगव्या पताका लाऊन गुढी उभारण्यात आली. यासाठी सरपंच रविंद्र कडूस यांनी पुढाकार घेतला. आता गुढीपाडव्याला हाच पायंडा कायम ठेवण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला. उपक्रमासाठी अमोल वाव्हळ, संजय काळे, संकेत कडूस, भूषण कडूस, राजेंद्र राहिंज, सोमनाथ काळे, शुभम धामणे, सुनील हारदे, किरण कडूस, सुरज काळे, गणेश काळे यांनी विशेष पुढाकार घेतला़