शहरातील जलतरण तलाव बंद करा
By Admin | Updated: March 19, 2016 00:10 IST2016-03-19T00:03:21+5:302016-03-19T00:10:10+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील काही भागात नागरिकांना वणवण करावी लागते आहे.

शहरातील जलतरण तलाव बंद करा
अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील काही भागात नागरिकांना वणवण करावी लागते आहे. अशा स्थितीत जलतरण तलाव सुरू करून महापालिका दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत जलतरण तलाव बंद ठेवावेत, अशी मागणी मनसेने महापालिका उपायुक्तांकडे केली आहे.
मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांनी उपायुक्त भालचंद्र बेहरे यांना शुक्रवारी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळाची झळ नगर शहराला बसत आहे. नागरिक पिण्याच्या पाण्यावाचून वंचित असताना शहरात मात्र जलतरण तलावातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होते आहे. नगर शहरातील सर्व जलतरण तलाव तातडीने बंद करावेत. एकीकडे नगर शहरात दिवसा आड पाणी येते.
केडगाव, शिवाजीनगर या भागात आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळते. शहरात पाण्याची स्थिती गंभीर असताना जलतरण तलावांना मोठ्या दाबाने पाणी पुरवठा केला जातो. महापालिकेने हे तलाव बंद केले नाहीत, तर मनसे आक्रमक पद्धतीने तलाव बंद करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा डफळ यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष गिरीश जाधव, नितीन भुतारे, सुरज वाणे, अभिषेक मोरे, परेश पुरोहित आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)