जिल्ह्यातील १६८६ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST2021-02-05T06:39:30+5:302021-02-05T06:39:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्चअखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या; परंतु मंत्रिमंडळाने हा निर्णय मागे घेतला असून, ...

जिल्ह्यातील १६८६ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्चअखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या; परंतु मंत्रिमंडळाने हा निर्णय मागे घेतला असून, जिल्ह्यातील १ हजार ६८५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. उपजिल्हा उपनिबधंक कार्यालयाकडून सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी अनिल ज. चौधरी यांचा आदेश मंगळवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झाला आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबविण्यात आल्या होत्या, त्या टप्प्यापासून तत्काळ सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १ हजार ६८५ सहकारी संस्थांची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत संपलेली आहे. या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यास मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. जिल्ह्यात ८८८ ‘ब’ वर्ग सहकारी संस्था आहेत. यापैकी १०० सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल. याशिवाय ५० सहकारी संस्थांची मतदार यादी अंतिम करण्यात येणार असून, त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. उर्वरित सहकारी संस्थांच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून केली जाणार आहे. मतदारयाद्या तयार करून त्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदार याद्यांची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण ६० ते ६५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे उर्वरित १ हजार ५३६ सहकारी संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. जिल्हा सहकारी बँकेसह काही सहकारी संस्थांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. जिल्हा बँकेसाठी येत्या २० रोजी फेब्रुवारी मतदान होत आहे. जिल्हा बँक निवडणुकीपाठोपाठ सहकारी संस्थांच्या निवडणूकाही जाहीर होणार असल्याने ग्रामीण भागातील राजकारण आणखी ढवळून निघणार आहे.
....
अशा आहेत सहकारी संस्था
ब- ८८८
क-५५१
ड-२४६