स्वच्छ शाळा स्पर्धेत नेप्तीची शाळा देशात चौथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 16:58 IST2017-08-21T16:54:25+5:302017-08-21T16:58:05+5:30
अहमदनगर : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयाने घेतलेल्या स्वच्छ भारत स्वच्छ शाळा या स्पर्धेत नगर तालुक्यातील नेप्ती येथील जिल्हा परिषद ...

स्वच्छ शाळा स्पर्धेत नेप्तीची शाळा देशात चौथी
अहमदनगर : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयाने घेतलेल्या स्वच्छ भारत स्वच्छ शाळा या स्पर्धेत नगर तालुक्यातील नेप्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने देशात चौथा क्रमांक मिळवला आहे. शाळेने ५० हजार रुपयांचे बक्षिस पटकावले आहे. १ सप्टेंबर रोजी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या यशामुळे नेप्तीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लागण्यासाठी हा उपक्रम देशभर राबविला. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न करणाºया व आरोग्य माहितीचे प्रसारण करून इतरांना प्रेरणा देणाºया शाळांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात नेप्तीच्या शाळेने देशात चौथा क्रमांक मिळविला़ यासाठी पाच क्षेत्रे निवडण्यात आली होती. पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्यासाठी व्यवस्था, स्वच्छता सुविधांची देखभाल, स्वच्छतेच्या सवयींची रुजवणूक यांचा यात समावेश होता. यात विद्यार्थ्यांना हात धुण्याची व्यवस्था हा प्रमुख मुद्दा होता तसेच या अभियानात विद्यार्थी, पालक, शिक्षक स्थानिक ग्रामस्थ यांचा सहभाग कसा आहे, यावर भर देण्यात आला. या सर्व निकषांत नेप्ती येथील शाळा यशस्वी ठरली.
देशातील १७२ पारितोषिक प्राप्त शाळांमधे नेप्तीच्या शाळेला चौथा क्रमांक मिळाला़ याची माहिती मिळताच शिक्षक व गावक-यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. पुरस्काराची ५० हजारांची रक्कम शाळा स्वच्छतेच्या उपक्रमासाठी खर्च करणार आहे, असे मुख्याध्यापक आबा लोंढे यांनी सांगितले. स्वच्छतेच्या उपक्रमात एकनाथ व्यवहारे, हिराबाई सोनवणे, रंजना गाडीलकर, मीना जाधव यांचे सहकार्य मिळाले. यशाबद्दल माजी सभापती संदेश कार्ले, अशोक कडूस, रमाकांत काटमोरे, अभय वाव्हळ, चंद्रकांत सोनार, रंगनाथ सोनवणे, व्यंकटेश बिराजदार, सरपंच मीनाताई जपकर आदींनी कौतुक केले़