नगरचे पुणे बसस्थानक तीन दिवसापासून अंधारात
By Admin | Updated: June 7, 2016 23:34 IST2016-06-07T23:29:49+5:302016-06-07T23:34:23+5:30
अहमदनगर: नगरच्या स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानक क्रमांक तीन वर तीन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसात सर्व्हिस केबल तुटल्याने बसस्थानक तीन दिवस अंधारात होते.

नगरचे पुणे बसस्थानक तीन दिवसापासून अंधारात
अहमदनगर: नगरच्या स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानक क्रमांक तीन वर तीन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसात सर्व्हिस केबल तुटल्याने बसस्थानक तीन दिवस अंधारात होते. यामुळे प्रवासी वर्गाला पाकिटमारीला तोंड द्यावे लागले. तर येथील वाहतूक नियंत्रकांना, वाहकांना मेणबत्तीच्या उजेडात काम करावे लागले.
तीन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसात बसस्थानकावरील वीज केबल तुटली होती. त्यामुळे बसस्थानक अंधारात होते. प्रवाशांचे यामुळे मोठे हाल झाले. पाकिटमारी, चोरीचे प्रकार सुरक्षा व्यवस्था असूनही येथे घडले. याबाबत स्थानक प्रमुखांनी महावितरणकडे अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे महावितरणने दुर्लक्ष केले. एस. टी. चे स्थानकप्रमुख रोज सर्व्हिस केबल जोडणीसाठी महावितरणला दूरध्वनी करून प्रत्यक्ष भेटून मागणी करीत होते. तरी याकडे दुर्लक्ष केले गेले. अंधारात महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. याबाबत महावितरणने आमच्याकडे कामाचा खूप ताण होता. त्यामुळे केबल जोडणीसाठी वेळ झाला, असे कारण सांगितले. तर बसस्थानकातील केबल जोडणीसाठी अनेक वेळा तक्रार करूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रवाशांना तीन दिवस अंधारात रहावे लागले, असे स्थानकप्रमुख अमोल सोमवंशी, वाहतूक नियंत्रक ए. जे. गमरे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)