नगरचे परवाने श्रीरामपूरला
By Admin | Updated: September 2, 2014 23:30 IST2014-09-02T23:30:44+5:302014-09-02T23:30:44+5:30
अहमदनगर : रिक्षा चालकांच्या परवान्याबाबत बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.

नगरचे परवाने श्रीरामपूरला
अहमदनगर : रिक्षा चालकांच्या परवान्याबाबत बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. तत्पूर्वी उपप्रादेशिक परिवहन विभागाने नाशिकप्रमाणे शिर्डी आणि राहात्यातील डिझेल रिक्षांना परमिट देण्याबाबत सहानुभूतीने विचार करावा. नगरमध्ये शिल्लक असलेले परमिट श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक कार्यालयातून वितरीत करण्यात यावेत. अशी विनंती कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथील अॅपेरिक्षा संघटनेने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.
शिर्डी आणि राहाता परिसरातील रिक्षा परमिट आणि वाहन चालकांच्या परवान्याच्या कारणाने पंधरा दिवसांपासून बंद आहेत. यासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक लखमी गौतम तसेच परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती.
नगर विभागात मोठ्या प्रमाणात परमिट शिल्लक आहेत. हे सर्व परमिट श्रीरामपूर विभागात देण्यात यावेत. यानंतर ते रिक्षा चालकांना वितरीत करावेत असे सुचित करून, विखे म्हणाले, येत्या एक-दोन दिवसातच अधिकारी बैठक घेऊन रिक्षा चालकांना परमिट देण्याबाबतचे धोरण ठरवतील. डिझेल रिक्षा सध्या बंद असल्या तरी नाशिक येथे या रिक्षांची वाहतूक सुरू आहे. याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना तपासून जिल्ह्यातही याबाबतची कार्यवाही उपप्रादेशिक परिवहन विभागाने करावी.
विखे यांनी वाहन चालकांच्या परवान्याबाबत मुंबई येथे परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांची भेट घेतली असून, बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही वाहन चालक परवान्याबाबत असलेल्या अटींसंदर्भात निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रिक्षा संघटनेचे चंद्रकांत शेळके, अजय जगताप, खलिउद्दीन शेख, राजीव बारहाते, बाबासाहेब सोमवंशी, दादाभाई इनामदार आदी रिक्षाचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)