नगर जिल्हा परिषद त्रिशंकू
By Admin | Updated: February 23, 2017 18:53 IST2017-02-23T18:53:45+5:302017-02-23T18:53:45+5:30
नगर जिल्हा परिषदेच्या ७२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था आहे.

नगर जिल्हा परिषद त्रिशंकू
अहमदनगर, दि.23 : नगर जिल्हा परिषदेच्या ७२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था आहे. कॉंग्रेसने सर्वाधिक २३ तर त्याखालोखाल राष्ट्रवादीने १८ जागा मिळविल्या आहेत. ‘मिशन फोर्टी’चा नारा देणारा भाजप १४ जागांवर थबकला आहे.
शिवसेना ७, माजी खासदार यशवंतराव गडाख यांची आघाडी ५, भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ तर अपक्ष ४ असे जिल्ह्यातील बलाबल आहे. अपक्षांतील एक सदस्य हा बाळासाहेब थोरात यांचा समर्थक असल्याने कॉंग्रेसचे संख्याबळ तसे २४ वर गेले आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व कोपगावच्या भाजप आमदार स्रेहलता कोल्हे यांना त्यांच्या तालुक्यात धक्के बसले आहेत. या आमदारांना जिल्हा परिषदेची एकही जागा मिळाली नाही. नेवाशाचे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनाही जिल्हा परिषदेची एकच जागा मिळाली.
नगर जिल्हा परिषदेत गतवेळी राष्ट्रवादीने ३२ तर कॉंग्रेसने २८ जागा मिळविल्या होत्या. या दोन्ही पक्षांची घसरण झाली आहे. गतवेळी अवघ्या सहा जागांवर असलेल्या भाजपने दुपटीहून अधिक जागा मिळवत १४ जागांवर मुसंडी मारली आहे. मात्र त्यांना जिल्ह्यातील क्रमांक एकचा पक्ष होण्याचे स्वप्न साकार करता आले नाही. शिवसेनेची गतवेळेपेक्षा केवळ एक जागा वाढली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर नेवासा तालुक्यातील माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला रामराम करत स्वतंत्र आघाडी करुन शेतकरी क्रांतीकारी पक्षाच्या नावावर ही निवडणूक लढवली. त्या आघाडीला नेवासा तालुक्यातील सातपैकी पाच जागा मिळाल्या असून नेवासा पंचायत समितीवरही त्यांनी वर्चस्व मिळविले आहे.
जिल्ह्यातील १४ पैकी दोन पंचायत समित्या कॉंग्रेसकडे, तीन भाजपकडे, तीन राष्ट्रवादीकडे, दोन सेनेकडे, एक सेना-भाजप युतीकडे तर एक गडाख यांच्या आघाडीकडे गेली आहे. श्रीरामपूर व कर्जत पंचायत समितीत त्रिशंकू अवस्था आहे.
राष्ट्रवादीचे माजी मंत्री मधुकर पिचड यांना पंचायत समितीतील सत्ता गमवावी लागेल असे चित्र आहे. कारण या पंचायत समितीतील १२ पैकी ४ जागा भाजप व ४ सेनेने जिंकल्या आहेत. भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा पंचायत समिती राष्ट्रवादीकडून आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. जिल्हा परिषदेत एकूण ७३ गट आहेत. एका गटाची निवडणूक न्यायप्रविष्ट असल्याने ती बाकी आहे. बहुमतासाठी ३७ जागांची आवश्यकता आहे. मात्र, तो आकडा एकाही पक्षाला गाठता आलेला नाही.
नगर जिल्हा परिषद पक्षीय बलाबल
कॉंग्रेस २३
राष्ट्रवादी १८
भाजप १४
शिवसेना ०७
भाकप ०१
शेतकरी क्रांतीकारी पक्ष०५
अपक्ष ०४
एकूण ७२