नगर जिल्हा विभाजनासाठी पाठपुरावा करणार-प्राजक्त तनपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 16:09 IST2020-01-04T16:08:09+5:302020-01-04T16:09:32+5:30
भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे़. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी (दि़४) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले़.

नगर जिल्हा विभाजनासाठी पाठपुरावा करणार-प्राजक्त तनपुरे
अहमदनगर : भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे़. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्यमंत्रीप्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी (दि़४) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले़.
तनपुरे म्हणाले, नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले आहेत. मंत्रीपद मिळावे, अशी प्रत्येकाला अपेक्षा असते़. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मात्र कुणीही नाराज नाही़. आम्ही निवडून आलेल्या आमदारांमध्ये चांगला सुसंवाद आहे़. मंत्रीपदाच्या माध्यमातून तिनही पक्षांच्या समान कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील विकासकामांना प्राधान्य देणार आहे़. यामध्ये निळवंडे धरणाचे कालवे, वांबोरी चारी, रस्ते, पाणी योजना आदी रखडलेल्या कामांना गती देण्यात येईल़.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिने जिल्ह्याला तातडीने पोलीस अधीक्षक मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. लवकरच अधीक्षकांची नियुक्ती होईल़ लष्कराच्या के़ के़ रेंज येथील जमिनीबाबत शेतक-यांवर अन्याय होणार नाही. यासाठी केंद्रिय मंत्र्यांकडे प्रश्न मांडणार असल्याचे तनपुरे म्हणाले़, राज्य सरकारची शिवभोजन ही योजना यशस्वी होईल, यात काही त्रुटी राहिल्या तर त्यात पुढील काळात सुधारणा करता येतील. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यात निवडून आलेल्या तरुण आमदारांकडून हजारे यांना चांगल्या कामाची अपेक्षा आहे़. मागील आमदाराला राहुरी तालुक्याचा विकास करता आलेला नाही़. शहरातील बसस्थानक, रस्ते, पाणी आदी प्रश्न प्रलंबित आहेत. येणा-या काळात सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचे उदष्टि असल्याचे तनपुरे म्हणाले़.
उद्योग खाते मिळावे ही अपेक्षा
राज्यमंत्री म्हणून कोणते खाते मिळणार हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे़. मात्र उद्योग खाते मिळाले तर सुशिक्षित बेरोजगारांसाठी नवनवीन योजना राबविण्याचा मानस आहे़. त्यामुळे उद्योग खाते मिळावे, अशी मागणी करणार आहे तसेच जिल्ह्यात जास्तीतजास्त रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तनपुरे म्हणाले़.