अहमदनगर : विविध योजनांच्या पाईपलाईन व मोबाईल कंपन्यांच्या केबलमुळे शहरातील रस्त्यांची चाळण झालेली असतानाच नव्याने गॅस पाईपलाईनसाठी महापालिकेकडून परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे पुन्हा रस्त्यांची दुरवस्था होणार असल्याने शहरातील रस्ते खोदणे कंपन्यांसाठी स्वस्त झाल्याचे चित्र यावरून पाहायला मिळत आहे.
भारत रिसोर्सेस कंपनीने शहरात गॅसची पाईपलाईन करण्याचा प्रस्ताव मनपासमोर ठेवला होता. ठरावीक रक्कम भरून सावेडी उपनगरातील रस्ते खोदण्यास परवानगी देण्यास महासभेनेही परवानगी देऊन टाकली. तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये गॅसपाईप टाकण्यास मंजुरी दिली. बांधकाम विभागाने ४ कोटी ४ लाख भरण्याबाबतचे पत्र संबंधित कंपनीला नुकतेच दिले. दरम्यानच्या काळात सावेडी उपनगरातील अनेक रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली गेली. ही कामे लॉकडाऊन व त्यानंतर झालेल्या पावसामुळे थांबली होती. ती आता कुठे सुरू झाली. ही कामे सुरू असताना दुसरीकडे गॅसपाईपसाठी रस्ते खोदण्यास परवानगी देणे योग्य आहे, का प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.
शहरात भुयारी गटारीचे काम सुरू आहे. त्यामुळे मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची पुरती चाळण झाली. इतर भागांत मोबाईल कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी रस्ते खोदले. त्यात आता महावितरणनेही भूमिगत केबल टाकण्याचे काम हाती घेतले आहे. कुष्ठधाम रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर पुन्हा हा रस्ता केबल टाकण्यासाठी खोदला गेला. याशिवाय फेज-२ चे पाईप टाकण्यासाठी तर शहरातील सर्वच मुख्य व अंतर्गत रस्ते खोदले गेले आहेत. त्यामुळे रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली असून आता पुन्हा गॅसची पाईपलाईन येणार आहे. त्यामुळे नव्याने झालेले रस्ते खोदावे लागणार असल्याने केलेला खर्चही वाया जाणार आहे.
..
पुन्हा पुन्हा रस्ते खोदाईमुळे ठेकेदारांचे फावले
महापालिकेकडून मोबाईल केबल, पाईपलाईन, नळजोड आदी कामांसाठी रस्ते खोदण्यास परवानगी दिली जाते. नव्याने केलेले रस्ते यामुळे खोदले जात असल्याने ठेकेदारही कंपन्यांचे नाव पुढे करून दुरुस्तीची जबाबदार झटकतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा केल्या जाणाऱ्या रस्ते खोदाईमुळे ठेकेदारांचे फावते.