नगर गारठले
By Admin | Updated: November 28, 2014 01:16 IST2014-11-28T00:50:03+5:302014-11-28T01:16:14+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा १०.३ अंशापर्यंत खाली आला आहे. राज्यातील सर्वात किमान तापमानाची नोंद नगरला झाली आहे.

नगर गारठले
अहमदनगर : जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा १०.३ अंशापर्यंत खाली आला आहे. राज्यातील सर्वात किमान तापमानाची नोंद नगरला झाली आहे. घरे गारठली आहेत, तर नदी-नाल्याकाठच्या परिसरात थंडीचा कडाका तीव्रतेने जाणवत आहे. थंडी मुळे डेंग्यू साथजन्य ताप असे आजार बळावण्याची शक्यता आहे. तर पिकांना ही थंडी लाभदायक ठरणार आहे.
ऐन थंडीच्या दिवसात म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्यानं थंडी लांबली होती. पावसानंतर वातावरणात उष्णता होती. त्यामुळे थंडी पळाली की काय?अशीच स्थिती वातावरणात राहिली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा हळूहळू खाली सरकला आहे. बुधवारी नोंद झालेले नगरचे तापमान १०.३ अंश सेल्सिअस इतके होते. हे तापमान राज्यातील सर्वात कमी (किमान) असल्याचे पुणे वेधशाळेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. या भागात नगरचा समावेश आहे. सरासरी तापमान १३ अंशापर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त झाली असली तरी येत्या दोन दिवसांमध्ये हे तापमान आणखी खाली घसरणार आहे. साधारणपणे ९ अंशापर्यंत हे तापमान खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री व पहाटेच्या वेळी ९ अंशावर, तर सकाळी व सायंकाळी १२ अंशापर्यंत तापमान आहे.(प्रतिनिधी)
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या तीव्रतेवर महाराष्ट्रातील थंडीची परिस्थिती अवलंबून आहे.उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आली आहे. तेथून येणारी शीतलहर महाराष्ट्रात येऊन धडकली आहे. त्या भागात शीत वारे जोराने वाहत आहेत. त्याचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. उत्तर भारतासोबत इशान्य दिशेकडून येणाऱ्या शुष्क व थंड वाऱ्यामुळे तापमानात कमाल व किमान घट झाली आहे. नगरचे कमाल तापमानही ३१ अंशावर आले आहे.
गूळ खा, थंडीला पळवा
४आयुर्वेदामध्ये गुळाला आरोग्यदृष्ट्या महत्त्व आहे.गूळ थंडीमध्ये जास्त ऊर्जा देणारा आहे. गूळ खाल्ल्याने रक्त वाढते, भूक वाढते. शक्तीवर्धक असलेला गूळ खाल्ल्याने सर्दी कमी होते.आल्यासोबत गूळ खाल्ला तर कफ नष्ट होतो. सुंठीसोबत गूळ खाल्ला तर वातविकार नष्ट होतो. तसेच थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे घालावेत, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
मुले जन्माला आली की त्यांना पाच दिवस कपडे घालू नयेत, ही जुनाट परंपरा आता बंद केली पाहिजे. जन्मत:च मुलांना स्वच्छ, सुती आणि उबदार कपडे घालावेत, अन्यथा मुलांची साखर कमी होणे, संसर्ग होण्याची भीती असते. थंडीमुळे सर्दी-खोकला असे आजार होत असल्याने कानटोपी घालून मुलांनी थंडीपासून रक्षण करावे. थंडीतही आईस्क्रीम खाण्याची पद्धत आजारांना निमंत्रण देणारीच आहे. सध्या डेंग्यू, फ्ल्यूसारखे आजार बळावले आहेत. त्यासाठी अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी मुलांची काळजी घ्यावी. बाहेरचे खाणे टाळावे.
- डॉ. सुचित तांबोळी, बालरोगतज्ज्ञ
अहमदनगर : औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाथर्डी तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील सहा रस्त्यांच्या कामांची २७ व २८ नोव्हेंबर रोजी चौकशी होणार आहे.
पाथर्डी तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता झाली आहे अशी याचिका अॅड. हरिहर गर्जे, अरविंद सोनटक्के, भागवत नरोटे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली आहे. या याचिकेनंतर या प्रकरणाची सहा महिन्यांत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचा आदेश खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.
यातील पाच महिन्यांचा कालखंड संपला आहे. आगास खांड ते दुलेचांदगाव व इतर सहा रस्त्यांच्या कामांची चौकशी २७ व २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या चौकशीसाठी सर्व अधिकाऱ्यांना तसेच रोजगार सेवकांनाही कामाच्या ठिकाणी कागदपत्रांसह बोलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)