स्वातंत्र्यदिनापासून शहर बस धावणार
By Admin | Updated: August 14, 2014 01:48 IST2014-08-14T01:23:34+5:302014-08-14T01:48:53+5:30
अहमदनगर : गत दोन महिन्यापासून बंद झालेली शहर बससेवा पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

स्वातंत्र्यदिनापासून शहर बस धावणार
अहमदनगर : गत दोन महिन्यापासून बंद झालेली शहर बससेवा पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. बससेवा चालविण्यासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या असून त्यावर निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची सभा गुरूवारी तातडीने बोलविण्यात आली आहे. १५ आॅगस्टपासून शहर बससेवा सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़
तोट्याचे कारण देत प्रसन्ना पर्पल या अभिकर्ता संस्थेने शहर बससेवा बंद केली. त्यानंतर दोन महिन्यापासून ही सेवा बंद आहे. नवीन अभिकर्ता नियुक्तीसाठी महापालिकेने मागविलेल्या निविदा बुधवारी उघडण्यात आले. यशवंत अॅटो सर्व्हिस, यशस्वी ट्रान्सपोर्ट व के.जी.पी ट्रान्सपोर्ट या तीन संस्थेच्या निविदा महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. त्यातील यशवंत अॅटो सर्व्हिसेस या संस्थेने प्रतिमहा प्रतिबस १ हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. अन्य दोन संस्थांनी ६०० व ७०० रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. सर्वाधिक निविदा यशवंत अॅटो सर्व्हिसेसची असल्याने ती मंजूर होईल.
शहर बससेवा चालविणाऱ्या अभिकर्ता संस्थेला नुकसान भरपाई म्हणून दरमहा पाच लाख रुपये देण्याचा ठराव स्थायी समितीने यापूर्वीच घेतलेला आहे. त्यामुळे याही संस्थेला पाच लाख रुपये या ठरावानुसार मिळतील. कोणाची निविदा मंजूर करावयाची यासाठी स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांनी गुरूवारी समितीची तातडीची सभा बोलविली आहे. त्यात निविदा मंजूर झाली की करारनामा, अनामत आदी सोपस्कार पूर्ण केल्यानंतर शहर बससेवा सुरू होणार आहे. १५ आॅगस्टला आ़ अरुण जगताप, महापौर संग्राम जगताप, किशोर डागवाले यांच्या हस्ते बससेवेचा प्रारंभ होईल़(प्रतिनिधी)