शहर बस कोर्टाच्या दारात!
By Admin | Updated: June 22, 2014 00:21 IST2014-06-21T23:44:01+5:302014-06-22T00:21:57+5:30
अहमदनगर : शहर बससेवा सुरू रहावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते हेमंत ढगे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. पाच जुलै रोजी त्यावर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.

शहर बस कोर्टाच्या दारात!
अहमदनगर : शहर बससेवा सुरू रहावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते हेमंत ढगे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. पाच जुलै रोजी त्यावर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले. न्यायालयामार्फत लवाद नेमून स्थायी समिती व अभिकर्ता संस्थेतील वाद मिटविण्याची मागणी ढगे यांनी याचिकेत केली आहे.
तोटा होत असल्याचे कारण सांगत प्रसन्ना पर्पल या अभिकर्ता संस्थेने शहर बससेवा बंद केली. व्यापक जनहिताच्यादृष्टीने बससेवा सुरू रहाणे गरजेचे आहे. स्थायी समिती व अभिकर्ता संस्था यांच्यातील मतभेद तसेच अभिकर्ता संस्था महापालिकेकडे करत असलेली आर्थिक मागणी या दोन बाबी सेवा बंद होण्यास कारणीभूत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत. मात्र ही सेवा सुरू राहण्यासाठी न्यायालयामार्फत लवाद नेमण्यात यावा. संस्थेने महापालिकेशी दहा वर्षाचा करारनामा केला आहे. परंतु दोन वर्षात सहा नोटीस पाठवून संस्थेने बससेवा बंद करण्याचा इशारा दिला होता. करारनाम्यात नमूद केल्यानुसार बसेस शहरात चालविल्या गेल्या नाहीत. तोट्याचे कारण सांगत अभिकर्ता संस्थेने नुकसान भरपाई वाढवून मागितली. वाढीचा प्रस्ताव निर्णयास्तव स्थायी समितीसमोर गेला. समितीने जनहिताचा विचार न करता आडमुठेपणाची भूमिका घेतली. त्यामुळे बससेवा बंद झाली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहर बससेवा सुरू असणे गरजेचे आहे. त्यासाठी लवाद नेमण्याची मागणी ढगे यांनी याचिकेत केली आहे. पाच जुलै रोजी त्यावर सुनावणी होणार असल्याचे ढगे यांनी सांगितले.
विशेष महासभा बोलवा
अहमदनगर : शहर बससेवेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष महासभा बोलविण्याची मागणी सेनेच्या नगरसेवकांनी महापौर संग्राम जगताप यांच्याकडे केली आहे.
तोट्यात असल्याने अभिकर्ता संस्थेने शहर बससेवा दि. १८ जूनपासून बंद केली आहे. परिणामी नगर शहरातील नागरिकांचे हाल होत आहे. बससेवा सुरू राहणे ही नगरकरांच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. स्थायी समितीने नुकसान भरपाई वाढवून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अभिकर्ता संस्थेने सेवा बंद केली आहे. ही सेवा तातडीने सुरू व्हावी यासाठी महापालिकेची विशेष महासभा बोलविण्याची मागणी सेनेचे गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक अनिल शिंदे, सुनीता मुदगल, उमेश कवडे, नंदीनी कदम, विक्रम राठोड, दिलीप सातपुते, शारदा ढवण, विद्या खैरे, दीपाली बारस्कर, विजय भांगरे, अनिल बोरुडे, आशा बडे, सुनीता फुलसौंदर, छाया तिवारी, सागर बोरुडे, मनोज दुलम, अनिता राठोड यांनी केली आहे. तसे पत्र महापौर संग्राम जगताप यांना देण्यात आले. शील शिंदे महापौर असताना त्यांनी सेवा बंद पडू दिली नव्हती याची आठवण या नगरसेवकांनी करून दिली. (प्रतिनिधी)