कुस्ती मैदानात रंगला चितपट कुस्त्यांचा डाव
By Admin | Updated: November 2, 2023 18:35 IST2014-05-15T23:02:52+5:302023-11-02T18:35:39+5:30
पारनेर : कुस्ती चितपट होणार नाही, दोन्ही नामवंत पैलवान आहेत, असे हजारो कुस्ती शौकीनांमध्ये चर्चा सुरू असतानाच करमाळ्याचा लखन शेख याने नगरच्या गुलाब आगरकरवर डाव टाकीत दोन मिनीटात अस्मान दाखविले.

कुस्ती मैदानात रंगला चितपट कुस्त्यांचा डाव
पारनेर : कुस्ती चितपट होणार नाही, दोन्ही नामवंत पैलवान आहेत, असे हजारो कुस्ती शौकीनांमध्ये चर्चा सुरू असतानाच करमाळ्याचा लखन शेख याने नगरच्या गुलाब आगरकरवर डाव टाकीत दोन मिनीटात अस्मान दाखविले. व लखन शेख याची कुस्ती शौकीनांनी पाठ थोपटली. पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील आधार प्रतिष्ठान, कै.अप्पाजी भिकाजी शिर्के व बाळुशेठ भिकाजी शिर्के, मारूतीशेठ आंधळे यांच्या स्मरणार्थ बुधवारी कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले होते. हरेश्वर मंदिरासमोरील मैदानात सुमारे एक लाख, अकरा हजार रूपयांची मानाची कुस्ती लखन शेख (करमाळा) व गुलाब आगरकर (नगर) यांच्यात झाली. आणि लखन शेखने अवघ्या दोनच मिनीटात गुलाव आगरकरला अस्मान दाखवित कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. दुसरीकडे राष्ट्रीय युवा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा पारनेरचा संदीप कावरे, अक्षय कावरे, भाळवणीचा अक्षय भुजबळ यांनी विरोधी कुस्तीगिरांना चितपट करून बक्षिसांची लयलूट केली. पंच म्हणून राष्ट्रीय पंच प्रा. संतोष भुजबळ, उत्तर महाराष्ट केसरी युवराज करंजुले, पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे यांनी काम पाहिले. यावेळी आमदार अनिल राठोड, जि.प.च्या कृषी समितीचे सभापती बाबासाहेब तांबे, उद्योजक माधव लामखडे, राजेंद्र शिंदे, हसन राजे, सुरेश ढोमे, मधुकर उचाळे, अनिल शिंदे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे व मान्यवर हजर होते. सकाळी सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई रामतीर्थंकर यांचे ‘कुटुंब व समाज’ या विषयावर व्याख्यान झाले. पत्रकार शिवाजी शिर्के यांनी उपस्थितांचे स्वागत केले. (तालुका प्रतिनिधी)