नेवाशात सोन्याचे दुकान फोडले : चार लाख रूपयांचा मुद्देमाल चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 19:40 IST2019-02-21T19:40:47+5:302019-02-21T19:40:54+5:30
शहरातील बाजारपेठेतील औदुंबर चौकातील अथर्व ज्वेलर्स हे सराफ दुकान फोडून ३ लाख ९३ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी गुरूवारी पहाटे लंपास केले.

नेवाशात सोन्याचे दुकान फोडले : चार लाख रूपयांचा मुद्देमाल चोरीस
नेवासा : शहरातील बाजारपेठेतील औदुंबर चौकातील अथर्व ज्वेलर्स हे सराफ दुकान फोडून ३ लाख ९३ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी गुरूवारी पहाटे लंपास केले.
याबाबत बालेंद्र मारूतीराव पोतदार यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. सीसीटीव्ही, डिव्हीआर उपकरण काढून चोरून नेले. दुकानातील काचेच्या ड्रॉवरखाली असलेल्या एक लाख त्रेचाळीस हजार रूपये किंमतीचे साडेतीन किलो चांदीचे दागिने व दोन लाख अडोतीस हजार रूपये किंमतीचे ७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार गुरूवारी पहाटे ३ वाजून २२ मिनिटांच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. यावेळी चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे. गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या समुारास दुकान फुटल्याचे मालक बालेंद्र पोतदार यांच्या निदर्शनास आले.
ठसे तज्ज्ञांची घटनास्थळी भेट
पोलिसांनी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाने गुरूवारी दुपारी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. दुकानातील ठसे घेण्यात आले. परिसरातील दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस हेडकाँस्टेबल तुळशीराम गिते अधिक तपास करीत आहेत.