महिला बालकल्याण समितीवर १६ सदस्यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:25+5:302021-09-02T04:47:25+5:30
अहमदनगर : महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी १६ महिला नगरसेवकांची बुधवारी नेमणूक करण्यात आली. सभापती निवडीसाठी प्रस्ताव विभागीय ...

महिला बालकल्याण समितीवर १६ सदस्यांची वर्णी
अहमदनगर : महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी १६ महिला नगरसेवकांची बुधवारी नेमणूक करण्यात आली. सभापती निवडीसाठी प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.
महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत महिला व बालकल्याण समिती सदस्यांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये नगरसेविका कमल सप्रे, पुष्पा बोरुडे, सुवर्णा गेनप्पा, सुरेखा कदम, शांताबाई शिंदे, वंदना ताठे, सोनाली चितळे, आशा कराळे, पल्लवी जाधव, सुप्रिया जाधव, मीना चोपडा, शोभा बोरकर, मीना चव्हाण, दीपाली बारस्कर, परवीन कुरेशी, अनिता पंजाबी यांचा समावेश आहे.
महापौर शेंडगे यांनी गटनेत्यांकडून बंद पाकिटात सदस्यांची नावे मागविली. राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी राष्ट्रवादीच्या पाच सदस्यांची नावे सुचविली. सेनेच्या सदस्यांची नावे महापौर शेंडगे यांनी जाहीर केली. त्या शिवसेनेच्या गटनेत्या आहेत. भाजपच्या गटनेत्या मालन ढोणे यांनी चार सदस्यांची नावे सुचविली. तसेच काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव यांनी बंद पाकिटातून स्वत:चे नाव दिले. बसपाचे गटनेते मुद्दसर शेख यांनी दिलेल्या पाकिटात अनिता जसपाल पंजाबी यांचे नाव होते. त्यांची समितीच्या सदस्यपदी नेमणूक केल्याची घोषणा महापौर शेंडगे यांनी केली.
...
सभापती पदासाठी चुरस
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी काँग्रेस व शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. सभापती पदावर शिवसेनेकडून दावा केला जात आहे. परंतु, महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता असूनही काँग्रेसला सत्तेत वाटा मिळालेला नाही. त्यामुळे ही समिती काँग्रेसला दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून सुप्रिया जाधव यांचे नाव आल्याने त्यांच्याकडून सभापती पदासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे सभापती पदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.