तंत्रज्ञानात बदल हरपले-अण्णा हजारे
By Admin | Updated: July 5, 2016 23:57 IST2016-07-05T23:54:00+5:302016-07-05T23:57:03+5:30
पारनेर : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आधुनिक तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल झाला असला तरी संस्कार हरवत चालले आहेत.

तंत्रज्ञानात बदल हरपले-अण्णा हजारे
पारनेर : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आधुनिक तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल झाला असला तरी संस्कार हरवत चालले आहेत. म्हणून विज्ञानातील प्रगती विनाशास कारणीभूत होऊ द्यायची नसेल तर आधुनिकतेला अध्यात्माची जोड देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
हजारे यांना मिळालेल्या पुरस्काराच्या ट्रस्टमार्फत मंगळवारी पारनेर तालुक्यातील माध्यमिक शाळांना संगणकाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. हजारे यांना मिळालेल्या विविध पुरस्काराच्या सुमारे एक कोटीहून अधिक रकमेचा स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी विविध सामाजिक कामे केली जातात. यावर्षी ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे यासाठी संस्थेमार्फत ४४ संगणकांचे वितरण करण्यात आले.
अण्णा म्हणाले, सध्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत ग्रामीण भागातील मुले टिकली पाहिजेत. शहरांमधील मुलांच्या बरोबरीने त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळाले पाहिजे. या उद्देशाने कृतज्ञता निधीतर्फे दुर्गम व गरजू शाळांना संगणक वाटपाचा निर्णय घेण्यात आला. दिवसेंदिवस एका बाजुला तंत्रज्ञान प्रगतीची झेप घेत आहे. मात्र त्याचवेळी दुदैवाने माणसाची नैतिक विचारांची पातळी घसरत आहे. म्हणून उच्चशिक्षित डॉक्टरने आपल्या पत्नीचा जाळून खून केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. यासाठी सुसंस्कारांची गरज आहे. असे संस्कार केवळ अध्यात्मातूनच मिळतील, असे अण्णा म्हणाले.
याप्रसंगी यादवबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिव मापारी, विश्वस्त ठकाराम राऊत, दगडू मापारी, साखराबाई गाजरे, गणपतराव पठारे व विविध शाळांचे मुख्याध्यापक, विविध संंस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक संजय पठाडे यांनी केले. सुभाष पठारे यांनी सूत्रसंचालन केले. दगडू मापारी यांनी आभार मानले.
कोहोकडी येथील रत्नेश्वर विद्यालय, पिंपळगाव रोठा येथील जयमल्हार विद्यालय, शिरापूर येथील अभिनव विद्यालय आणि पळशी येथील शासकीय आश्रमशाळा या शाळांना प्रत्येकी १२ संगणकाचे वितरण करण्यात आले. यासाठी स्वामी विवेकानंद कृतज्ञता संस्थेने सुमारे सहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी अण्णांच्या हस्ते संगणक साहित्याचा स्वीकार केला