आदिवासींच्या विवाहात बदलाचे वारे
By Admin | Updated: March 31, 2017 19:15 IST2017-03-31T19:15:11+5:302017-03-31T19:15:11+5:30
लग्नकार्यात मानपान देणे व वराती नाचविणे या प्रथा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आदिवासींच्या विवाहात बदलाचे वारे
>आॅनलाइन लोकमत
अकोले (अहमदनगर), दि. ३१ - काळाची गरज ओळखून आदिवासी समाजात ‘सामुदायिक विवाह सोहळा’ रुजविण्याचा निर्धार शेंडी भंडारदरा येथे आदिवासी मित्र मंडळ व पश्चिम पट्टा आदिवासी वारकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच लग्नकार्यात व हळदी समारंभात मानपान देणे घेणे व वराती नाचविणे या प्रथा तातडीने बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
शेंडी (भंडारदरा) येथील दत्त मंदिरात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आदिवासी मेळाव्यात या निर्णयाची घोषणा करण्यात आली. माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे, काशिनाथ साबळे, मारुती लांघी, बाबूराव अस्वले, प्रा.दिलीप रोंगटे, सुरेश गभाले, देवराम महाराज इदे, तुकाराम महाराज बांडे, लक्ष्मण उघडे, पांडुरंग इदे, विठ्ठल खाडे, आनंद खाडे, आनंद मधे, सीताराम झडे, पुनाजी सगभोर आदी उपस्थित होते.
लग्नात मानापानाच्या नावाखाली हजारो रुपयांची उधळपट्टी केली जाते. ढांगाढोंगावर मोठा खर्च होतो. या सर्व बाबींवर निर्बंध म्हणून सामुदायिक विवाह सोहळा ही काळची गरज असल्याने आदिवासी मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून सामूहिक विवाह चळवळ राबविली जाणार आहे. योग्य त्या कागदपत्रांसह नावनोंदणी करून वधूवरांकडून प्रत्येकी ५०० रुपये, १ पोते तांदूळ घेऊन मंडळामार्फत वधू-वराचे कपडे, हळदी समारंभ, पुरोहित, लाईट मंडप व जेवणाचा खर्च केला जाणार आहे. अमृतेश्वर मंदिर रतनवाडी,भंडारदरा येथील धरणाच्या पायथ्याची बाग, घोरपडा देवी मंदिर रंधा आदी ठिकाणी सामुदाईक विवाह सोहळ्यांचे विभागवार आयोजन करण्याचे यावेळी ठरले. आदिवासी समाजात हे क्रांतिकारक पाऊल उचलले जात असल्याने २ मे रोजी आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १०१ विवाह करण्याचा मानस अशोक भांगरे यांनी यावेळी व्यक्त केला.