बुद्धीसह आत्म्यात होतो बदल
By Admin | Updated: July 21, 2016 23:57 IST2016-07-21T23:48:11+5:302016-07-21T23:57:18+5:30
राहाता: वीणा वाजवण्या करीता ज्याप्रमाणे तारा समतोल असाव्या लागतात, त्याप्रमाणे जीवनासाठी समतोल आहार आवश्यक आहे़

बुद्धीसह आत्म्यात होतो बदल
राहाता: वीणा वाजवण्या करीता ज्याप्रमाणे तारा समतोल असाव्या लागतात, त्याप्रमाणे जीवनासाठी समतोल आहार आवश्यक आहे़ शरीर व मनाने समतोल राखला तर आत्म्याचा शोध घेता येतो़ मन परिवर्तनाचा बुध्दीला व आत्म्याला बदलवणारा संस्काराचा हा चतुर्मास असल्याचे मत साध्वी प्रीतिसुधाजी म़सा़ यांनी व्यक्त केले़
राहाता येथे साध्वी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात आयोजित ज्ञान संस्कार चतुर्मास निमित्त त्या बोलत होत्या़ प्रवचन देताना पुढे त्या म्हणाल्या, तत्वशून्य राजकारण, श्रमशून्य सम्पत्ती, चरित्र शून्य जीवन व मानवताशून्य विज्ञान या मुळे अनागोंदी व अनास्था निर्माण होते़ जीवनात पहिले सुख निरोगी काया आहे़ घरात माया असेल तर घरातील नारी सुशिल होते़
आज्ञाकारी गृहिणीमुळे घरात स्वर्गा सारखी शांतता निर्माण होते़
अत्यंत खादाडपणा हे असंस्कृत पणाचे लक्षण आहे़ अन्नातून ऊर्जा, ऊर्जेतून बुध्दी व बुध्दीतून ध्येय प्राप्ती मिळते़ आहार साधा व सकस हवा़ स्वास्थ सांभाळणे बुध्दीवंताचे लक्षण आहे़
निसर्गाने आपल्याला भरपूर दिले आहे़ त्या मुळे आपण खूप श्रीमंत आहोत़ संस्कार बाजारात विकत मिळत नाही तर ते घडवून घ्यावे लागतात़लोखंडाचा तुकडा लोहाराकडे नेला व त्याची घोड्याची नाल बनवली तर त्याचे बाजारात हजार रुपये येतात, तोच तुकडा कारखानदाराकडे दिला तर त्याच्या सुया बनवून त्याची किंमत पाच हजार रुपये होते, तोच तुकडा घड्याळ कंपनीच्या मालकाकडे दिला तर त्याची किंमत २५ हजार रुपये होते, या प्रमाणे माणसावर संस्कार झाले तर मनुष्य अनमोल बनतो़ असा उपदेश साध्वी प्रीतिसुधाजी यांनी केला़
पुणे येथील सुभाषराव पिपाडा, शिर्डीचे संघपती पृथ्वीराज लोढा, ललिताताई बांठीया, लुधियाना येथील गणेशभाई, अंमळनेर येथील पाटील या सर्वांचे प्रीतिसुधाजी संकुलाचे अध्यक्ष इंद्रभान डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, पुनम डांगे, भगवान डांगे यांनी स्वागत केले. राजेश भन्साळी, बाबुशेठ पिपाडा, रमेश सांड, प्रविण जैन यांच्यासह जैन अजैन श्रावक उपस्थित होते .
(वार्ताहर)