पिंपळवाडीत चंदन तस्करी
By Admin | Updated: June 16, 2014 00:10 IST2014-06-15T23:39:38+5:302014-06-16T00:10:19+5:30
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण-राशीन मार्गालगतच्या पिंपळवाडी वनक्षेत्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर चंदन तस्करी चालू आहे.
पिंपळवाडीत चंदन तस्करी
कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण-राशीन मार्गालगतच्या पिंपळवाडी वनक्षेत्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर चंदन तस्करी चालू आहे.
कुळधरण भागात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र विखुरलेले आहे. पिंपळवडी, कोपर्डी, धालवडी, दुरगाव फाटा, राक्षसवाडी, तळवडी येथे शेकडो एकरांचे वनक्षेत्र आहे. खैर, लिंब, सिसम, चंदन, बाभूळ आदी झाडे जंगलात आहेत. मात्र वृक्षतोडीमुळे ही वनांची क्षेत्रे विरळ झाली आहेत. आता पिंपळवडी जंगलातील चंदन तस्करी समोर आली आहे.
मोठ्या झाडांचा तोड
कुळधरण-राशीन मार्गाच्या दुतर्फा हे वनक्षेत्र आहे. जंगलाच्या राशीनकडील टोकाला शेकडो चंदनाची झाडे आहेत. येथे काळीभोर जमीन असल्याने चंदनाच्या झाडांना अनेक फुटवे फुटलेले आहेत. मात्र यातील मोठ्या आकाराची अनेक झाडे तोडून नेल्याचे आढळून आले.
मोठ्या रुंदीच्या झाडाच्या बुंध्यात आढळणाऱ्या सुवासिक मौल्यवान गाभ्याची तस्करी झाल्याचे स्पष्टपणे दिसते. या सुवासिक गाभ्याचा हजारोंचा दर असल्याने त्यावर तस्करांचा डोळा आहे.
(वार्ताहर)
वनक्षेत्राची पाहणी करू
कर्जतचे वनक्षेत्रपाल एस. ए. बोराडे यांच्याशी चंदन तस्करी संदर्भात संपर्क केला असता त्यांचा फोन नॉट-रिचेबल होता. वनपाल डी. वाय. शेख यांनी सांगितले, हे वनक्षेत्र वनरक्षक मांडगे यांचेकडे आहे. त्यांना तोड झालेल्या वनक्षेत्राची पाहणी करुन पंचनामा करण्याचे सांगू.