नेवासाफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 15:26 IST2019-01-10T15:23:43+5:302019-01-10T15:26:51+5:30
नेवासाफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

नेवासाफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन
नेवासा : नेवासाफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेनेते दशरथ सावंत यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
नेवासाफाटा येथील राजमुद्रा चौकामध्ये दुपारी झालेल्या रास्तारोको प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ.अशोकराव ढगे यांनी आलेल्या शेतक-यांचे स्वागत केले. राज्याचे उपाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी प्रास्ताविक करतांना शेतक-यांच्या व्यथा मांडल्या. शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येऊन ७/१२ कोरा करण्यात यावा. कृषिपंपाचे वीज बिल पुर्णपणे माफ करण्यात यावे. एफ.आर.पी.प्रमाणे एक रकमी व सरकारी अनुदान मिळावे. दुष्काळ निधी किमान पाच हजार एकराप्रमाणे शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. कांदा आणि दुधास शासकीय अनुदान मिळावे. शेतक-यांना पेन्शन अनुदान योजना लागू करावी. अशा मागण्या त्यांनी यावेळी बोलताना मांडल्या.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास कोरडे, संघटनाध्यक्ष प्रकाश पोकळे, गुलाबराव डेरे, प्रताप पटारे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांची यावेळी भाषणे झाली. सदरचा रास्तारोको अर्धा तास चालला. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर शेतकरी नेते पी.आर.जाधव यांनी आभार मानले. यावेळी निवासी नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर व पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या.