अहमदनगर : दीपावलीनिमित्त बाजारपेठांमध्ये विविध वस्तुंच्या विक्रीची दालने सजली असून, बाजारात चैतन्य पसरले आहे़ अवघ्या काही दिवसांवर दीपावलीचा सण येऊन ठेपला असून, विविध वस्तुंच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरु आहे़दीपावलीनिमित्त नवीन कपडे खरेदी करण्याकडे सर्वांचाच कल असतो़ विविध प्रकारच्या आकर्षक तयार कपड्यांनी वस्त्रदालने सजली आहेत़ वाहन वितरकांकडे दीपावलीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नोंदणी सुरु असून, दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री दालनांमध्ये गर्दी होत आहे़ दीपावलीनिमित्त नवीन दागिने खरेदीकडे महिलावर्गाचा कल अधिक असतो़ सुवर्णदालनांमध्ये आकर्षक तयार दागिने उपलब्ध करण्यात आले असून, सुवर्णदालनांमधील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे़ टीव्ही, फ्रिज, मोबाईल अशी विविध इलेक्ट्रीक साधनांनी इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दालने सजली असून, ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरु आहे़ विद्युत रोषणाईसाठी दीपमाळा, आकाश कंदील, सजावटीचे साहित्य आदींनी बाजार फुलला आहे़ दीपावलीचे फराळ तयार करण्यासाठी महिलावर्गात लगबग सुरु झाली असून, बाजारात फराळाचे साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे़ घरांची रंगरंगोटी सुरु आहे़ दीपावलीत दिव्यांना विशेष महत्व असून, त्यासाठी बाजारात आकर्षक पणत्या आणि लक्ष्मी मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, शहरातील विविध भागात पणत्या व लक्ष्मी मूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत़ लक्ष्मीपूजनाचे साहित्य आणि लक्ष्मी (झाडणी) विक्रीचेही स्टॉल लागले आहेत़ दीपावलीत फटाक्याची विक्री जोरात होते़ शहरातील विविध भागात फटाके विक्रीचे स्टॉल लावले जातात़ फटाके विक्रीचे स्टॉल लावण्यासाठी परवाना घेण्यासाठी फटाके विक्रेत्यांची लगबग सुरु आहे़ यंदा गांधी मैदान, प्रोफेसर चौक, कल्याण रोड परिसरात मोठ्या प्रमाणात फटाके विक्रीचे स्टॉल लागणार आहेत़ दीपावलीच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरु असून, सायंकाळी बाजार गर्दीने फुलत आहे़ दीपावलीत विविध वस्तुंच्या खरेदीतून करोडो रुपयांची उलाढाल होणार आहे़ (प्रतिनिधी)
दीपावलीनिमित्त बाजारात चैतन्य
By admin | Updated: October 13, 2014 23:07 IST