अध्यक्षा गुंड घेणार मंगळवारी पदभार
By Admin | Updated: September 28, 2014 23:25 IST2014-09-28T23:10:36+5:302014-09-28T23:25:57+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या कर्जतच्या मंजूषा गुंड मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

अध्यक्षा गुंड घेणार मंगळवारी पदभार
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या कर्जतच्या मंजूषा गुंड मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार अजून मुहूर्ताच्या शोधात असून विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे हा कार्यक्रम लांबला आहे.
जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर रणनिती आखत सेना-भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यात आले. अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या श्रीगोंद्याच्या गुंड यांना तर उपाध्यक्षपद काँग्रेसचे श्रीगोंद्याचे शेलार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने एकमेंकाच्या समोर असल्याने जिल्हा परिषदेतील या सत्तेचा त्यांना फारसा उपयोग होणार नाही. श्रीगोंद्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या विरोधात सर्व पक्षाने ताकद एकवटली. त्यासाठी शेलार यांना पद दिलेले आहे.
अध्यक्ष गुंड यांना अध्यक्षपद मिळू नये, यासाठी कर्जत तालुक्यातून विरोध झाला. मात्र, विधानसभा निवडीचे तिकीट डोळ्यासमोर ठेवून झालेला विरोध मावळालाही. या दोन्ही पदाच्या निवडी झाल्यानंतर साधारण आठ दिवसांचा कालावधी लोटलेला आहे. मात्र, नूतन पदाधिकाऱ्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची धूम सुरू आहे. यामुळे नूतन पदाधिकारी पक्षाच्या प्रचारात रमले आहेत. यातून मंगळवारी गुंड पदभार स्वीकारणार असल्याची माहिती देण्यात आली तर शेलार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप पदभार स्वीकारण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.
(प्रतिनिधी)