‘युवा मोर्चा’च्या अध्यक्षांची पळवापळवी
By Admin | Updated: May 28, 2016 23:41 IST2016-05-28T23:33:30+5:302016-05-28T23:41:56+5:30
अहमदनगर : भाजपाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांना केडगावला अडवून शहरातील तीन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

‘युवा मोर्चा’च्या अध्यक्षांची पळवापळवी
अहमदनगर : भाजपाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांना केडगावला अडवून शहरातील तीन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहाकडे निघालेल्या टिळेकर यांना नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानाकडे आणले. त्यामुळे विश्रामगृहावर बसलेल्या युवा कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. नगर भाजपामधील गटबाजीने मात्र टिळेकर यांची पुरती तारांबळ उडाली.
केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा प्रसार व दुष्काळ दौरा करण्यासाठी आमदार टिळेकर जालना येथे निघाले होते. ते नगरकडे येत असताना सावेडी, भिंगार आणि केडगाव मंडलाच्या युवा कार्यकर्त्यांनी टिळेकर यांचे केडगाव येथे स्वागत केले. भाजपाच्या युवा मोर्चातर्फे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याची कल्पना टिळेकर यांना होती. त्यामुळे टिळेकर हे केडगाव येथून थेट विश्रामगृहाकडे निघाले. याचवेळी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी त्यांना बैठकीचे ठिकाण बदलले आहे, विश्रामगृहाऐवजी निवासस्थानी येण्याचे सांगितले. टिळेकर तेथे आल्यानंतर खासदार कार्यालयापासून गांधी यांच्या निवासस्थापर्यंत त्यांची ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली. यावेळी तेथे त्यांचा सत्कार करण्यात आला. विश्रामगृहावर काही कार्यकर्ते ताटकळत बसले होते. मात्र गांधी गटाने ऐनवेळी बैठकीचे ठिकाण बदल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला.
(प्रतिनिधी)