सुप्यातील कंपनीवर केंद्रीय पथकाचा छापा
By Admin | Updated: July 22, 2014 00:09 IST2014-07-21T23:22:19+5:302014-07-22T00:09:28+5:30
पारनेर : तालुक्यातील सुपा येथील आम इंडीया कंपनीवर केंद्रीय अबकारी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि़ २१) दुपारी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत कागदपत्रे तपासणीचे काम सुरु होते.
सुप्यातील कंपनीवर केंद्रीय पथकाचा छापा
पारनेर : तालुक्यातील सुपा येथील आम इंडीया कंपनीवर केंद्रीय अबकारी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि़ २१) दुपारी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत कागदपत्रे तपासणीचे काम सुरु होते. या कारवाईबाबत अबकारी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गोपनीयता पाळली असून, कोणतीही माहिती सांगण्यास नकार दिला.
सुपा एम.आय.डी.सी. येथे पारनेर रस्त्यावर आम इंडीया कंपनी आहे. सुपा औद्योगिक वसाहतीतील ही सर्वात मोठी कंपनी असून, चारचाकी वाहनांचे अॅक्सलचे उत्पादन या कंपनीत केले जाते. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे येथून आलेल्या केंद्रीय अबकारी विभागाच्या एका पथकाने आम इंडीया कंपनीत प्रवेश केला आणि तात्काळ कंपनीचे गेट सील केले़ कंपनीतील कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली. कंपनीतील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी काम बंद करुन कोणीही बाहेर जाऊ नये, असे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी कंपनीच्या बाहेरील मुख्य गेटला कुलूप ठोकल्याने कच्चा माल घेऊन आलेली वाहने बाहेरच उभी करण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजता कार्यालयीन कर्मचाऱ्यांची सुट्टी झाल्यावर त्यांना सोडण्यात आले़ मात्र, कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास मनाई केली होती. अंबर दिव्याच्या वाहनात दोन अधिकारी आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
छाप्याची गोपनियता
कंपनीतून तयार होणाऱ्या उत्पादनावर बाहेर पडतानाच कर आकारला जातो़ त्यामध्ये काही तफावत असल्याने यापूर्वी कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती़ पण कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली असून, कोण अधिकारी तपास करीत आहेत, याची सुध्दा माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचू दिली नाही़
कंपनीमध्ये अधिकारी पाहणीसाठी येत असतात़ पण केंद्रीय अबकारी कर विभाग व कोणी छापा टाकला याची माहिती नाही. त्याबद्दल काहीही माहिती सांगता येणार नाही.
- रवींद्र राऊत,
मनुष्यबळ व्यवस्थापक,
आम इंडीया कंपनी