केंद्राच्या निधीमुळे ग्रामीण विकासाला दुहेरी गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:41+5:302021-07-02T04:15:41+5:30
तिसगाव : केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाने पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना निधी मिळू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला दुहेरी ...

केंद्राच्या निधीमुळे ग्रामीण विकासाला दुहेरी गती
तिसगाव : केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाने पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना निधी मिळू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला दुहेरी गती मिळत आहे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
श्री क्षेत्र मढी (ता.पाथर्डी) येथे पंधराव्या वित्त आयोगातून सहा गावांना घनकचरा संकलन कुंड्यांचे वितरण गुरुवारी करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. आगामी काळातील निवडणुकांमध्ये विद्यमान सदस्यांनाच पुन्हा संधी देण्यावरून प्रसंगी झालेल्या जाहीर शेरेबाजीवरून या कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. उपसभापती मनीषा वायकर अध्यक्षस्थानी होत्या.
श्री क्षेत्र मढी, धामणगाव देवीचे, निवडुंगे, घाटशिरस, हात्राळ, सैदापूर गावांना ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी दहा कुंड्यांचे वितरण यावेळी करण्यात आले. सरपंच संजय मरकड यांच्या वाढदिवसानिमित्त भावी जिल्हा परिषद सदस्य अशा सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्टवरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली.
माजी सरपंच भगवान मरकड यांनी विद्यमान सदस्यांचे काम चांगले असल्याने त्यांनाच पुन्हा संधी देण्याची गुगली टाकली. संजय मरकड यांनी आपण उमेदवारीच्या स्पर्धेत नाहीत, असे सांगत समारोप करताना यावर पडदा टाकला. या शेरेबाजीनंतर आमदार राजळे यांनीही आरक्षण डोळ्यासमोर ठेवून महिला सदस्यांनीही भाषणाची तयारी ठेवावी, असा चिमटा काढला. यावेळी पुरुषोत्तम आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, सरपंच गणेश पालवे, रवींद्र आरोळे, रवींद्र वायकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.