निळवंडेसाठी केंद्राने विशेष पॅकेज द्यावे : राधाकृष्ण विखे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:01 IST2018-10-20T16:00:19+5:302018-10-20T16:01:00+5:30
निळवंडे धरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पंतप्रधानांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

निळवंडेसाठी केंद्राने विशेष पॅकेज द्यावे : राधाकृष्ण विखे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
शिर्डी : निळवंडे धरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पंतप्रधानांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
शिर्डी येथे शुक्रवारी साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांना विरोधी पक्षनेते विखे यांनी निळवंडे धरणासंदर्भात सविस्तर निवेदन देवून, विशेष पॅकेजची मागणी केली. विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण ११२ जलसिंचन प्रकल्पांना विशेष पॅकेज जाहीर केले आहे. निळवंडे प्रकल्प हा सुध्दा जिरायती भागातील जलसिंचन प्रकल्प असून, या प्रकल्पास केंद्र सरकारच्या जलसिंचन आयोगाने निधीकरीता सर्व तांत्रिक मंजुरी दिल्या असल्याकडे विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.
राज्य सरकारने निळवंडे धरणाकरीता २२३२ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असून कालव्यांसहीत धरणाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी ११३३ कोटी रुपयांच्या निधीची तातडीने गरज आहे. या निधीसाठी केंद्रीय जलसिंचन विभागाकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. निळवंडे जलसिंचन प्रकल्पास या विशेष निधीचे पॅकेज मंजूर झाल्यास निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील एकूण १८२ गावातील ६८ हजार ८७८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल आणि जिरायती भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, ही बाब विखे यांनी प्रधानमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.