प्रशिक्षणादरम्यान केंद्रप्रमुखाचा मृत्यू
By Admin | Updated: June 12, 2014 00:07 IST2014-06-11T23:33:47+5:302014-06-12T00:07:38+5:30
जामखेड : व्यवहारे यांचे हृदयविकाराने निधन
प्रशिक्षणादरम्यान केंद्रप्रमुखाचा मृत्यू
जामखेड : इयत्ता तिसरीच्या वर्गासाठी पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देत असताना सोनेगाव (ता़ श्रीगोंदा) केंद्राचे केंद्रप्रमुख सदाशिव नारायण व्यवहारे (वय ५२) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाला.
ल. ना. होशिंग विद्यालयात पुनर्रचित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु आहे. पहिल्या सकाळच्या सत्रातील एक तासाचे प्रशिक्षण संपवून केंद्रप्रमुख सदाशिव व्यवहारे यांनी मधल्या वेळेत जेवण उरकले़ व पुन्हा दुसऱ्या सत्राचे व्याख्यान देण्यास उभे राहिले असताना अचानक खाली कोसळले. त्यावेळी उपस्थित शिक्षकांनी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले़ तेथील डॉक्टरांनी तपासले असता त्यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणून रात्री उशिरा त्यांच्यावर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला़ त्यांच्यावर कान्हूरपठार (पारनेर) येथे रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले़ व्यवहारे सहा महिन्यापूर्वीच श्रीगोंदा तालुक्यातून बदली होऊन जामखेडला आले होते. त्यांचे मूळगाव पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार हे गाव होते. (तालुका प्रतिनिधी)
प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी
सध्या कडाक्याचे ऊन आहे़ त्यामुळे प्रशिक्षणात बदल करण्याची मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेने केली होती़ मात्र, संघटनेच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही़ प्रशिक्षणस्थळी सुविधाही नव्हत्या़ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच व्यवहारे यांचा मृत्यू झाला आहे़ - राजेंद्र शिंदे, जिल्हाध्यक्ष,
प्राथमिक शिक्षक संघटना
प्रभारी गटशिक्षणाधिकारी अंकुश जंजीरे यांनी प्रशिक्षण कालावधीत मोठी वाढ केली होती़ सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशी दीर्घ वेळ प्रशिक्षणासाठी जंजीरे यांनी निवडली होती़ राज्यात कोठेही अशी दीर्घ वेळ प्रशिक्षणासाठी नाही़ याबाबत ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाची वेळ सकाळी ९़३० ते ४़०० करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार प्रशिक्षण वेळेत जंजिरे यांनी बदल केला होता़
उपजिल्हा शिक्षण अधिकारी काळे हे प्रशिक्षण स्थळी निरीक्षण भेटीसाठी आले होते. प्रशिक्षण सुरु असताना काळे उपस्थित होते़ त्यांच्यासमारेच व्यवहारे यांना हृदयविकाराचा झटका आला़