दहीहंडी उत्सवाला सेलिब्रिटींचे आकर्षण

By Admin | Updated: August 17, 2014 23:45 IST2014-08-17T23:03:55+5:302014-08-17T23:45:34+5:30

अहमदनगर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी आयोजक मंडळे व गोविंदा पथक सज्ज झाले आहेत़

Celebrity attraction of the Dahihandi festival | दहीहंडी उत्सवाला सेलिब्रिटींचे आकर्षण

दहीहंडी उत्सवाला सेलिब्रिटींचे आकर्षण

अहमदनगर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी आयोजक मंडळे व गोविंदा पथक सज्ज झाले आहेत़ सेलिब्रिटींची उपस्थिती आणि गाण्यांच्या तालावर शहरातील विविध चौकांमध्ये सोमवारी दहीहंडीचा उत्सव रंगणार आहे़ प्रेरणा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित दहीहंडी उत्सवासाठी सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय व दिल्लीगेट येथील दहीहंडीसाठी अभिनेत्री सायली भगत येणार असल्याने दहीहंडीचा आनंद द्विगुणित होणार आहे़
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे सर्वांनाच मोठे आकर्षण असते़ हा उत्सव आता काही तासांवर येऊन ठेपला असून, आयोजक मंडळे व गोविंदा पथकांनी जय्यत तयारी केली़ चौकाचौकात फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले
आहेत़
शहरातील माळीवाडा बसस्थानकाशेजारील शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस व प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी सायंकाळी सात वाजता दहीहंडी उत्सवाला प्रारंभ होणार आहे़ विवेक ओबेरॉय याच्या उपस्थितीत येथे १ लाख ११ हजार १११ रुपयांची ही दहीहंडी होणार आहे़ तर दिल्लीगेट येथे हरिहरेश्वर मित्रमंडळ, सिद्धेश्वर, जंगुभाई ट्रस्ट व छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्यावतीने १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक विजेत्यांना देण्यात येणार असून, या ठिकाणी अभिनेत्री सायली भगत उपस्थित राहणार आहे़
चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्यावतीने दहिहंडी फोडणाऱ्या पथकाला ७७ हजार ७७७ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे़
दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांकडे एकूण २५ मंडळांनी परवानगी मागितली आहे़ शहरातील दिल्लीगेट, चौपाटी कारंजा, रंगार गल्ली, बुरुड गल्ली, नेता सुभाष चौक, गांधी मैदान, लक्ष्मी कारंजा, प्रोफेसर कॉलनी, सावेडी उपनगर, भिंगार, पाईपलाईन रोड, चितळे रोड आदी भागात विविध मंडळांच्यावतीने दहीहंडी उत्सव रंगणार आहे़ शहरातील प्रमुख मंडळांच्या दहीहंडी फोडण्यासाठी जिल्ह्यासह पुणे, मुंबई, कल्याण, भिवंडी येथील गोविंदा पथके सहभागी होणार आहेत़ (प्रतिनिधी)
हंडी फोडायचीय़़़? हेल्मेट वापरा
शहरात विविध मंडळांच्या वतीने किमान ४५ ते ४० ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला कुठलेही गालबोट लागू नये म्हणून दहीहंडीच्या ठिकाणासह शहरातील विविध चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़ महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आयोजकांना सूचित केले आहे़
असा आहे बंदोबस्त
५ एपीआय व पीएसआय दर्जाचे अधिकारी
८० पोलीस कर्मचारी
३० होमगार्ड
एसआरपीची एक प्लाटूनसह ट्रायकिंग फोर्स
१२ वर्षाखालील बालगोविंदाला दहीहंडी फोडता येणार नाही़
ध्वनीक्षेपण यंत्रणा ६५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजात लावता येणार नाही़
हंडी फोडणाऱ्यांना हेल्मेट व सुरक्षा पट्टा पुरविणे़
थर रचण्यात सहभागी असणाऱ्यांचे नाव, फोटो पत्ता व पथकाचे नाव घेणे़
डीजेला मनाई
दहीहंडी उत्सवात पोलिसांनी डीजे वाजविण्यास मनाई केली आहे़ याबाबत पोलिसांनी साउंड सिस्टिम व्यावसायिक व आयोजक मंडळ अशा ४८ जणांना नोटीस बजावली आहे़

Web Title: Celebrity attraction of the Dahihandi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.