तीन वर्षांपासून पाथर्डी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:43+5:302021-07-09T04:14:43+5:30
पाथर्डी : पोलीस ठाण्याचा कानाकोपरा सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून गेल्या तीन वर्षांपासून पाथर्डी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही ...

तीन वर्षांपासून पाथर्डी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही बंद
पाथर्डी : पोलीस ठाण्याचा कानाकोपरा सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून गेल्या तीन वर्षांपासून पाथर्डी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही बंद आहेत. पोलीस ठाण्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही आवश्यक आहेत. मात्र, याकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २ डिसेंबर २०२० मध्ये देशातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील गैरप्रकाराला आळा बसावा, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रत्येक खोलीत रात्रीच्या वेळीही चित्रीकरण व ध्वनिमुद्रण करतील, असे कॅमेरे बसवावेत. हे चित्रीकरण १८ महिने कालावधीसाठी जतन करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु, या आदेशाचा विसर पाथर्डी पोलीस ठाण्याला पडला आहे. या महत्त्वाच्या गोष्टीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही कमालीचे दुर्लक्ष होत आहे.
पाथर्डी पोलीस ठाण्यातील कारागृह परिसरातील सीसीटीव्हीही बंद आहेत. त्यामुळे मर्जीतल्या आरोपींना चमचमीत जेवण, आरोपींच्या विनापरवाना भेटीगाठी, गुटखा, भेटायला येणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून थेट इच्छित ठिकाणी संपर्क करून दिले जाण्याचे प्रकार येथे सुरू असल्याची चर्चा आहे. ्रआरोपींना भेटायला येणाऱ्यांच्या नोंदी घेतल्या जात नाहीत.
पोलीस ठाण्यातील मुद्देमाल, अपघातातील दुचाकी, चारचाकीच्या बॅटऱ्या, सुटे भाग परस्पर गहाळ होतात. सीसीटीव्ही बंद असल्याने फिर्याद दाखल करण्यास आलेल्यांना नाहक ताटकळत बसावे लागत असल्याचे प्रकारही समाेर आले आहेत. पोलीस ठाण्याच्या आवारात आरोपींना भेटण्यासाठी गर्दी असते. कारागृहाच्या जवळच पोलिसांचे शस्त्रागार असून, त्याठिकाणीही खासगी लोकांचा वावर असतो. पोलीस ठाण्याच्या आवारातून ताब्यात असलेली वाळू चोरीची वाहनेही पळविल्याबाबतचे गुन्हेही दाखल आहेत; तरीदेखील सीसीटीव्ही यंत्रणा दुरुस्त होत नसल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
----
कारागृहातील सर्व व्यवस्थापन तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येते. कारागृहातील कैद्यांना विनापरवाना जेवण अथवा इतर पदार्थ देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त असून, नवीन यंत्रणा बसविण्यात आली आहे. परंतु, अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नाही. याबाबत संबंधितांना सूचना देणार आहे.
-अरविंद जोंधळे,
पोलीस निरीक्षक, पाथर्डी
----
०८ पाथर्डी पोलीस, १
पाथर्डी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही यंत्रणा तीन वर्षांपासून नादुरुस्त आहे.