पावसाअभावी टंचाईस्थिती
By Admin | Updated: July 12, 2014 01:11 IST2014-07-11T23:29:29+5:302014-07-12T01:11:08+5:30
विसापूर : जून महिना कोरडा गेला. जुलै अर्धा संपत आला. परंतु श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर भागात अजुनही पावसाचे आगमन झालेले नाही. पाऊस नसल्याने माळरानावर हिरवळ फुलली नाही.
पावसाअभावी टंचाईस्थिती
विसापूर : जून महिना कोरडा गेला. जुलै अर्धा संपत आला. परंतु श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर भागात अजुनही पावसाचे आगमन झालेले नाही. पाऊस नसल्याने माळरानावर हिरवळ फुलली नाही. त्यामुळे चाराप्रश्न गंभीर आहे.
आषाढी एकादशी दरम्यान चांगला पाऊस होऊन बाजरी, कडधान्य व कांदा लागवड करता येईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेत मशागत करुन ठेवली होती. मात्र पावसाने निराशा केल्याने शेतकरी अडचणीत आहेत.
गेल्यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी दुष्काळातून सावरून निघतील असे वाटत असतानाच गारपीटीने तडाखा दिला. या नैसर्गिक संकटातून सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु यंदा अजून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. विसापूर व मोहरवाडी (कोळगाव) या दोन्ही तलावांनी तळ गाठला असून केवळ गाळमिश्रीत पाणी शिल्लक आहे. टंचाईस्थितीमुळे कोळगाव येथील काही वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरु करावे लागले. आता कोळगाव येथेही टँकर सुरु करावे लागतील, अशी स्थिती आहे. पाणी उपसा टाळण्यासाठी मोहरवाडी तलाव परिसराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. काही दिवसापूर्वी प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात विसापूर तलावातून पाणी उपसा करणारे वीज पंप जप्त करण्याची कारवाई केली. (वार्ताहर)
पाणी पुरवठा विस्कळीत
शेवगाव : शेवगाव तालुक्यात जेमतेम सहा टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत.
पावसाअभावी पाणी टंचाईच्या तीव्रतेत वाढ होत असून ग्रामसेवकांच्या संपामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होत आहे. तालुक्यातील अमरापूर येथून पाथर्डी तालुक्यासाठी पाणी भरणारे ३३ टँकर गेल्या दोन दिवसांपासून डिझेलअभावी उभे असल्याने पाथर्डी तालुक्याचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने ‘मनसे’ चे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी शुक्रवारी प्रशासनाला जाब विचारणारे आंदोलन केले.
याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास शनिवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
पावसाअभावी शेवगाव तालुक्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ होत आहे. तालुक्यातील २५ गावे व ९२ वाड्या, वस्त्यांना २५ टँकर ७१ खेपाव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. हसनापूर येथील ढाकणे वस्ती परिसरातील काहींनी पाईपलाईन फोडून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय चालू असल्याची तक्रार दिनकर ढाकणे व अन्य शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे केली.
(तालुका प्रतिनिधी)