अहिल्यानगर : शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागातील लेखा व्यवस्थापक विजयकुमार महादेव रणदिवे व तत्कालीन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना कोतवाली पोलिसांनी बुधवारी रात्री उशिराने अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
शासनाकडून महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी प्राप्त झालेला १६ लाख ५० हजारांचा निधी वैयक्तिक खात्यात ट्रान्सफर करून अपहार केल्याप्रकरणी लेखा व्यवस्थापक रणदिवे व वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरगे यांच्याविरोधात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अपहाराची १६ लाख ५० हजार इतकी रक्कम लेखा व्यवस्थापक रणदिवे यांनी ९ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांच्या वैयक्तिक खात्यात वर्ग केल्याचे चौकशीत समोर आले. त्यानुसार अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे.