अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST2021-08-22T04:24:54+5:302021-08-22T04:24:54+5:30
आदिवासी समाजातील १४ वर्षे वयाच्या मुलीचा गुरुवारी सायंकाळी ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. हे घर आरोपी ...

अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
आदिवासी समाजातील १४ वर्षे वयाच्या मुलीचा गुरुवारी सायंकाळी ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. हे घर आरोपी आकाश राधू खरात याचे आहे. मुलीच्या घरापासून ते हाकेच्या अंतरावर आहे. घटनेनंतर गुरुवारी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मुलीचे कुटुंबीय व नातेवाईक त्यावर समाधानी नव्हते. मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. आरोपीचे नाव पोलिसांना सांगितले होते. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, त्यानंतरच तसा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे होते. शुक्रवारी रात्री नगर येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.
शनिवारी दुपारी मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात खरात (वय २५) या आरोपीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश हा मुलीला लग्नाची मागणी करत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री चितळी गावात मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे पथकासह उपस्थित होते. घटनेपूर्वी मुलगी बेपत्ता झाली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे आरोपी आकाश खरात याच्या घरात तिचा मृतदेह मिळून आल्याने तपासाचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.