साथीच्या आजारात स्वच्छता राखा, लस टोचून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST2021-04-02T04:20:20+5:302021-04-02T04:20:20+5:30
साईबाबांच्या हयातीत १९११ सालच्या अखेरीस शिर्डी व परिसरात प्लेगची साथ सुरू झाली. ऐन दिवाळीत वसुबारसेच्या दिवशी १९ ऑक्टोबर १९११ ...

साथीच्या आजारात स्वच्छता राखा, लस टोचून घ्या
साईबाबांच्या हयातीत १९११ सालच्या अखेरीस शिर्डी व परिसरात प्लेगची साथ सुरू झाली. ऐन दिवाळीत वसुबारसेच्या दिवशी १९ ऑक्टोबर १९११ रोजी शिर्डीत एका महिलेचा बळी घेऊन प्लेगची साथ सुरू झाली. ही साथ जवळपास शंभर दिवस होती. जानेवारी १९१२ नंतर साथीला हळूहळू उतार पडला. या साथीने शिर्डीतील ७१ नागरिकांचे बळी घेतले. या वेळी शिर्डीची लोकसंख्या अवघी १,६२१ होती. यात ८२३ पुरुष व ७८८ स्त्रियांचा समावेश होता.
प्लेगच्या साथीचे साईबाबांनी निर्मूलन करावे यासाठी पोलीस पाटील दुर्गाजी रावजी कोते यांच्यासह शिर्डीतील गावकऱ्यांनी ११ डिसेंबर १९११ रोजी सायंकाळी द्वारकामाईत बाबांची भेट घेतली. या वेळी साईबाबांनी शिर्डीकरांना रस्ते स्वच्छ करा, स्मशाने, थडगी स्वच्छ करा व गोरगरिबांना अन्नदान करा, असा कानमंत्र दिला होता.
या वेळी साईबाबांनी स्वहस्ते द्वारकामाई मशिदीची स्वच्छता केली होती.
साईबाबांच्या सूचनेनुसार नंतरच्या काळात तात्या पाटील कोते यांच्या अध्यक्षतेखाली शिरडी स्वच्छता समिती स्थापन झाली. यात पशुवैद्यक चिदांबरम पिल्ले, रामचंद्र दादा कोते व माधवराव देशपांडे यांचा समावेश होता.
.............
साईबाबा अंधश्रद्धेला थारा देत नसत. साईभक्त असलेले नानासाहेब चांदोरकर नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे सचिव होते. प्लेग सुरू झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नानासाहेबांना लस टोचून घ्यायला सुचवले. नानासाहेबांनी याबाबत बाबांना विचारले असता बाबांनी नानासाहेबांना लस टोचून घेण्यास सांगतानाच काहीही होणार नाही, अशी ग्वाहीही दिली. यानंतर नानासाहेबांनी लस टोचून घेतली, त्यामुळे त्यांच्या कचेरीतील अन्य कर्मचाऱ्यांसह शेकडो लोकांनी लस टोचून घेतली. कुणालाही काहीही झाले नाही.
.................
आज परिस्थिती व साथीचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हात स्वच्छ ठेवा, मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे टाळा, प्रत्येकाने लस टोचून घ्या, अशा स्वरूपात साईबाबांची शिकवण पुन्हा अंमलात आणण्याची आवश्यकता आहे.
- कान्हुराज बगाटे, सीईओ, साईसंस्थान