धोकादायक इमारतीतून चालतोय कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:16+5:302021-09-09T04:26:16+5:30
कोपरगाव : कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची ब्रिटिशकालीन इमारत जीर्ण झाल्याने छताला गळती लागली आहे. पोलीस ठाण्यात काम करताना नेमके ...

धोकादायक इमारतीतून चालतोय कारभार
कोपरगाव : कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची ब्रिटिशकालीन इमारत जीर्ण झाल्याने छताला गळती लागली आहे. पोलीस ठाण्यात काम करताना नेमके बसायचे कोठे, असा प्रश्न येथील अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील ५५ गावांच्या सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या पोलिसांच्याच सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोपरगाव तालुक्यात एकूण ७९ गावे आहेत. त्यातील ३ गावे ही राहाता पोलीस ठाणे, ११ गावे शिर्डी पोलीस ठाण्यांतर्गत येतात. पूर्वी कोपरगाव पोलीस ठाण्यांतर्गत एकूण ६५ गावे होती. जानेवारी २०१५ मध्ये पोलीस ठाण्याची विभागणी करून कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाणे अशा दोन स्वतंत्र पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरासह १० गावे, तर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५५ गावांचा कारभार देण्यात आला. त्यात शहर पोलीस ठाण्याचा कारभार आहे त्याच इमारतीमधून सुरू होता, तर तालुका पोलीस ठाण्यास कोपरगाव नगर परिषदेच्या ब्रिटिशकालीन इमारतीत स्थलांतर करून कामकाज सुरू करण्यात आले होते. याउलट गेल्या दोन वर्षांत शहर पोलीस ठाण्याची भव्य अशी अद्ययावत इमारत उभी असून, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
तालुका पोलीस ठाण्यात १ पोलीस निरीक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, तर ५२ पोलीस कर्मचारी अशी पदे मंजूर आहेत. सद्य:स्थितीत या इमारतीच्या छताला गळती लागली आहे. आतमध्ये कार्यालयातील सर्वच टेबलच्या परिसरात पाणी आहे. त्यामुळे पृष्ठभागही उखडला आहे. बाहेरून आत प्रवेश करताना तर छतातून टिपकणाऱ्या पाण्याने भिजल्याशिवाय प्रवेशच मिळत नाही.
...........
पोलीस ठाण्याची इमारत ही कोपरगाव नगर परिषदेकडून भाडेतत्त्वावर घेतलेली आहे. इमारत जुनी असल्याने तिला ठिकठिकाणी लागलेली गळती थांबविण्यासाठी नगर परिषदेने दुरुस्ती करून द्यावी.
- दौलतराव जाधव, पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस ठाणे, कोपरगाव
...............
मी नव्यानेच पदभार स्वीकारला असल्याने यासंदर्भात करारनाम्यातील तरतुदी तपासून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- शांताराम गोसावी, मुख्याधिकारी, नगर परिषद, कोपरगाव
---------------
फोटो - कोपरगाव पोलीस ठाणे
ओळी -
१ ) पोलीस ठाण्याच्या छताला गळती लागल्याने पाणी साचत आहे.
२ ) इमारतीच्या आतील भागात पाणी साचलेले आहे.
३ ) छत पूर्णतः जीर्ण झाले आहे.