उष्णतेमुळे नगरकरांच्या जीवाची काहिली
By Admin | Updated: May 17, 2016 23:57 IST2016-05-17T23:57:34+5:302016-05-17T23:57:37+5:30
अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे़ तापमानात वाढ होऊन नगरचा पारा मंगळवारी ४१ अंशांवर पोहोचला होता़ उकाडा असह्य झाला

उष्णतेमुळे नगरकरांच्या जीवाची काहिली
अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे़ तापमानात वाढ होऊन नगरचा पारा मंगळवारी ४१ अंशांवर पोहोचला होता़ उकाडा असह्य झाला असून, पुढील शनिवारपर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे़ त्यामुळे नागरिकांनी पुढील चार दिवस आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे़
मान्सून पुढील आठवड्यात सक्रिय होण्याची शक्यता असतानाच अचानक उष्णतेची लाट आली आहे़ हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यभर १७ ते २१ या काळात उष्णतेची लाट असणार आहे़ तापमानात अचानक वाढ झाली आहे़ नगरचे तापमान मंगळवारी कमाल ४१ तर किमान २७ अंश होते़
पुढील दोन दिवस त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे़ सकाळी ८ वाजताच प्रखर ऊन पडले होते़ दुपारी वातावरणातील उकाडा वाढून घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते़ उन्हामुळे मळमळणे, डोकेदुखी, चक्कर येणे यांसारखा त्रास होत असून, उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे़
शहरासह जिल्ह्यात दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. प्राणीमात्रालाही उन्हाचा तडाखा बसत आहे. (प्रतिनिधी)